पंढरपूर : यंदाच्या आषाढी वारीत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणर आहे. या माध्यमातून लोकसंख्या मोजली जाणार आहे. तसेच इतर ठिकाणी गुन्हे केलेल्या गुन्हेगारांचा चेहरा या माध्यमातून तपासला जाणार आहे. यातून ज्या ठिकाणी गर्दी होणार त्या ठिकाणचा सतर्कतेचा इशारा नियंत्रण कक्षाला मिळणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे.

आषाढी यात्रापूर्व नियोजनासाठी पोलीस अधीक्षक येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके उपस्थित होते. आषाढी वारीला लाखो लोक येतात. हजारो दिंड्या आणि त्यांची वाहने, एसटी बसेस, खासगी वाहन याचे नियोजन केले जाते. पोलीस प्रशासन मागील वारीतील अनुभव लक्षात घेऊन अधिकच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. यंदा पोलीस प्रशासनाकडून प्रयागराजच्या धर्तीवर ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. वारीला किती लोक येतात याची मोघम माहिती किंवा अंदाजे आकडेवारी काढली जाते. मात्र आता ड्रोनच्या माध्यमातून याचा वापर केला जाणार आहे. शहरातील एका भागात किती नागरिक आहेत याचे मोजमाप या माध्यमातून केले जाणार आहे. जवळपास ७० ते ८० टक्के अचूकता यात असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली आहे. तसेच राज्यातून काही खिसेकापू,चोरी, दरोडे असे विविध गुन्हे केलेले गुन्हेगार यात्रेत येतात. त्यांचा चेहरा शोधण्यास याची मदत मिळू शकणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात विविध ठिकाणी २५० ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ असून याला सदर नवीन तंत्रज्ञान जोडले जाणार आहे. या साठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या ठिकाणाहून वारी संदर्भातील अनेक सूचना शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना देण्याची व्यवस्था केली आहे. या शिवाय वाहतूक व्यवस्थेबाबत देखील याचा वापर करून जर वाहतूक खोळंबली तर ती सुरळीत करणे, वाहतूक अन्य मार्गावरून वळवणे यासारख्या पर्यायाचा वापर करता येईल. या शिवाय दरवर्षीप्रमाणे आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वारकऱ्यांना मदत कक्ष, वारकरी वेशातील पोलीस बंदोबस्तासाठी राहणार आहेत. येणाऱ्या भाविकांची वारी सुरक्षित करणार आहोत, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.