हिंगोली : रेल्वे पोलीस असल्याचे शव वाहतुकीसाठी पैशाची गरज असल्याची सांगत ऑनलाईन रक्कम उकळली. या प्रकरणी मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली. यांची मोठी टोळी असून त्यांनी अनेकांना गंडा घातला आहे.
कळमनुरी येथील पोलीस निरीक्षकांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबासाठी मदत देण्याची विनंती केली. स्वतःला रेल्वे पोलीस अधिकारी सांगत आरोपीने शव वाहतुकीसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून ऑनलाइन रक्कम उकळली. मानवी संवेदनांना हात घालत करण्यात आलेल्या या फसवणुकीत काही सामाजिक कार्यकर्ते व पोलिस कर्मचारीही नकळत ओढले गेले.
मात्र, घटनेतील विसंगती लक्षात आल्याने पोलिसांनी सायबर तपास सुरू केला. मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपासाची सूत्रे थेट मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात पोहोचली. त्यानंतर विशेष पथकाने तेथे जाऊन अमित कुरमी, विरसिंग गौंड आणि भारत कुरमी या तिघांना अटक केली. चौकशीत आरोपींनी अशाच प्रकारे खोट्या अपघातांच्या कहाण्या सांगून विविध जिल्ह्यांमध्ये लोकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. या प्रकरणातून मोठी टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या भावनिक आवाहनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कोणतीही आर्थिक मदत करण्यापूर्वी संबंधित घटनेची खातरजमा करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
