सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे नगारे वाजायला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी यांनीही सोलापूरचा दौरा करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रामुख्याने लक्ष्य केले. आगामी निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत असलेल्या एमआयएमने सोलापुरात आपल्याशिवाय कोणतेही राजकीय गणित पूर्ण होणार नाही, हेदेखील सूचित केले आहे. विशेषत: धर्मनिरपेक्षता आणि मुस्लीम आरक्षण या दोन मुद्दय़ांवर दोन्ही काँग्रेसची कोंडी करण्याचा एमआयएमचा निर्धारही स्पष्ट झाला आहे.

सोलापूर महापालिका भाजपच्या ताब्यात असली तरी यापूर्वी विरोधक म्हणून जी प्रतिमा भाजपने जपली होती, ती प्रतिमा मागील वर्षांत महापालिकेचा कारभार चालविताना धुळीस मिळाली आहे. परंतु तरीही अपयशाचे खापर प्रशासनावर फोडत आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपने सूक्ष्म नियोजन आखायला सुरुवात केली आहे. तर भाजपमधील  गटबाजी, अपयशी कारभार, विशेषत: स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दर्जाहीन कामांविषयी सामान्य नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीचा विचार करता आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याची निर्णायक ताकद विरोधकांमध्ये अजून तरी दिसून येत नाही.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीपाठोपाठ एमआयएमने आगामी पालिका निवडणुकीसाठी ताकद लावायला सुरुवात केली आहे.

External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
BJP leaders in Gadchiroli
आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…

हुतात्मा स्मृतिमंदिरात खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी पक्षाचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करीत नवचैतन्य निर्माण केले आहे. यात पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटत पहिला डाव तरी साधला आहे. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे व नंतर एमआयएममध्ये राहून अलीकडे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक निर्माण केलेले वादग्रस्त नगरसेवक तौफिक शेख व अन्य काही नगरसेवक एमआयएमपासून दूर झाले आहेत. त्यामुळे सोलापुरात एमआयएमचे भवितव्य काय? आगामी महापालिका निवडणूक लढविण्याची ताकद एमआयएमकडे राहणार काय, याविषयी स्थानिक राजकीय वर्तुळात प्रश्नार्थक चर्चा सुरू असतानाच त्याचे उत्तर खुद्द असदोद्दीन ओवेसी यांनीच सोलापूरला येऊन दिले आहे.

सोलापूर महापालिकेत एमआयएमचे नऊ  नगरसेवक आहेत.राजकीय पक्षांची मोर्चेबांधणीगेल्या महिन्यात शरद पवार यांनी सोलापूरचा दौरा करून शहर व ग्रामीणचा पक्षकार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. इतकेच नव्हे तर यापूर्वी काँग्रेस व शिवसेनेत राहिलेले माजी महापौर महेश कोठे यांच्यासह अन्य पक्षाच्या नेत्यांना जवळ करून पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. सोलापूरच्या राजकारणाविषयी शरद पवार यांनी गांभीर्याने लक्ष घातले असून यात स्थानिक विविध जाती-धर्माची गणिते घालून आगामी महापालिका निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवून सत्ता मिळविण्याचा त्यांचा स्पष्ट निर्धार दिसून येतो. त्याच धर्तीवर खासदार ओवेसी यांनीही सोलापूरकडे लक्ष घालून एमआयएमपासून दुरावलेल्या तौफिक शेख यांच्यावाचून पक्षाचे काहीही अडत नाही. उलट पक्षाला आणखी पुढची मजल गाठता येते, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांना दिला आहे.

एमआयएमला भाजपची ‘बी टीम’ म्हणून दोन्ही काँग्रेसकडून नेहमीच हिणवले जाते. त्याला खासदार ओवेसी यांनी ठोस उत्तर देऊन स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारे दोन्ही काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सत्तेवर कसे, असा सवाल केला. शिवसेना धर्मनिरपेक्ष पक्ष आहे काय, याचे उत्तर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना पुन्हा भाजपचा हात पकडून जाणार नाही हे कशावरून, असाही सवाल करून खासदार ओवेसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर प्रश्नचिन्ह लावले. महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर चालविलेल्या सरकारचाही उल्लेख करताना, अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादीने कोणतीही कारवाई केली नाही. उलट, नंतर शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्तेवर येताना याच अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री केले.

त्याचा उल्लेख करून ओवेसी यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. देशातील भाजप सरकारला मुस्लीम आरक्षण प्रश्नाविषयी काहीही देणेघेणे नाही. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारनेही गेल्या दोन वर्षांत मुस्लीम आरक्षणावर मौन पाळले आहे. त्यावरही ओवैसी यांनी सोलापुरात दोन्ही काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. धर्मनिरपेक्षता आणि मुस्लीम आरक्षण हे दोन्ही मुद्दे एमआयएमकडून आगामी निवडणुकांमध्ये आणले जाऊ  शकतात. त्याचे उत्तर दोन्ही काँग्रेस कसे देणार, यावर आगामी राजकारण अवलंबून आहे. एमआयएमच्या या सापळ्यात अडकून दोन्ही काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.