scorecardresearch

लव्ह जिहादचा कायदा असंवैधानिक असल्याची ओवैसींची टीका; म्हणाले, “भाजपामधील अनेक लोकांनी…”

दोन प्रौढ व्यक्ती स्वतःच्या मर्जीने लग्न करत असतील तर त्यांच्यामध्ये येण्याचा कुणाला अधिकार नाही, असे वक्तव्य औवेसी यांनी केले.

लव्ह जिहादचा कायदा असंवैधानिक असल्याची ओवैसींची टीका; म्हणाले, “भाजपामधील अनेक लोकांनी…”
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (संग्रहित छायाचित्र)

“लव्ह आणि जिहाद या दोनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तलवार उचलून कुणाला तरी मारणं याला लोक जिहाद समजतात, हेही चूक आहे. भारताचे संविधान प्रत्येक पौढ नागरिकाला त्याच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याचा अधिकार देतो. जर कुणी आपल्या पसंतीनुसार जोडीदार निवडून लग्न करत असेल तर त्यावर दुसऱ्यांना त्रास होण्याचे काय कारण? दुसरे असे की भाजपशासित राज्यात जिथे जिथे लव्ह जिहादचा कायदा बनला, तो असंवैधानिक आहे. भाजपाला प्रेमाचा एवढा राग का येतो? प्रत्येक गोष्टीला सांप्रदायिक रंग द्यायची गरज नाही. महाराष्ट्रात शेतकरी अडचणीत आहे, त्यावर काही बोलले जात नाही. महाराष्ट्रातील युवकांचे ज्वलंत प्रश्न आहेत, त्यावर बोलायला तयार नाहीत.”, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना दिली.

भाजपा मधील अनेक लोकांनी धर्माच्या बाहेर…

मध्य प्रदेशने केलेल्या कायद्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे. लव्ह जिहादच्या बाता मारणाऱ्या भाजपा पक्षातील अनेकांनी धर्माच्या बाहेर जाऊन लग्न केलेले आहे. पण आपण कोणत्या विषयावर चर्चा करत राहायची. आज देशात बेरोजगारी हाच मोठा मुद्दा आहे. महागाई सहा टक्क्याने वाढली आहे. बेरोजगारी आठ टक्क्यांवर आली आहे, जगात सर्वात जास्त बेरोजगारी आपल्याकडे आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले आहेत. हे सोडून जे लग्न करतायत त्यांच्यामध्ये तुम्ही का पडतायत? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला.

प्रेमात आडकाठी आणणारे तुम्ही कोण?

जर कुणी पैसे देऊन धर्म परिवर्तन करायला लावत असेल तर त्याच्याविरोधात आधीच सुप्रीम कोर्टाने २५ वर्षांपूर्वी निकाल दिलेला आहे. पण जर कुणी स्वेइच्छेने धर्मपरिवर्तन करत असेल त्याच्यामध्ये आडकाठी आणणारे तुम्ही कोण? असा सवाल त्यांनी भाजपाला विचारला. कुणी ख्रिश्चन किंवा मुस्लिम व्यक्ती स्वतःचा धर्म बदलतो, त्यापासून यांना कोणतीही अडचण नाही. ज्याला जे करायचे ते करु द्यायला हवे. त्यांचा तो कायदेशीर अधिकार आहे.

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. देशात जेव्हापासून भाजपाचे सरकार आलंय तेव्हापासून अल्पसंख्याक, दलित आणि वंचित समाज त्रस्त आहे. मॉब लिंचिग, बेकायदेशीररित्या घरे उध्वस्त करणे, उत्तराखंडमध्ये चार हजार घरात राहणारे ७० हजार लोक एवढ्या कडाक्याच्या थंडीत बाहेर कुडकुडत आहेत. तिकडे लक्ष द्यायला भाजपाला वेळ नाही, अशीही टीका यावेळी औवेसी यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 12:40 IST

संबंधित बातम्या