छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम (AIMIM) पक्षाला ३० हून अधिक जागांवर विजय मिळत आहे. तसेच महाराष्ट्रात एमआयएमला १०० हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएमच्या विजयावर वक्तव्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात कोणकोणत्या महानगरपालिकांमध्ये एमआयएमच्या जागा निवडून आल्या आहेत, यावर भाष्य केले आहे. इम्तियाज जलील काय म्हणाले ते जाणून घेऊया.
भाजपाच्या विजयावर इम्तियाज जलील म्हणाले, “भाजपाचा विजय होणे स्वाभाविक आहे. त्यांच्याकडे पैसा व पूर्ण ताकद होती. पण भाजपाचे पूर्ण महाराष्ट्रात एक लक्ष्य होते, ते म्हणजे त्यांना एकनाथ शिंदेंची शिवसेना संपवायची होती. त्यामुळे त्यांनी (छत्रपती संभाजीनगरमध्ये) ऐनवेळी युती तोडली. आता शिवसेना (शिंदे) एमआयएमच्या मागे आहे. त्यांचा एक मंत्री, पालकमंत्री, सहा आमदार, खासदार असून त्यांनी काय केले? त्यांच्या सभांमध्ये फक्त एमआयएम, इम्तियाज जलील हेच मुद्दे होते. एमआयएम जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप व्हायचा, आज आम्ही हिंदू महिलांनाही निवडून आणले आहे. हे सामान्य लोकांचं यश आहे.”
शहराच्या विकासासाठी भाजपाचे समर्थन करणार का असा सवाल इम्तियाज जलील यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “शहराच्या विकासासाठी नक्कीच आम्ही समर्थन करू. पण समांतर सारख्या योजना आणून भाजपाचा अजेंडा तुम्ही थोपवणार असाल तर आम्ही त्यांना विरोध करू”, असा इशारा जलील यांनी दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहे. त्यानंतर एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
आजपर्यंत एमआयएमला कधीही इतके मोठे यश मिळाले नव्हते, जितके आज मिळाले आहे, असे इम्तियाज जलील म्हणाले. महाराष्ट्रात एमआयएमला मिळालेल्या यशाबद्दल जलील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “गोवंडीत आम्ही ४ जागा, मुंब्र्यात ५ जागा, धुळ्यात ८ जागा, अमरावतीत ९, अकोल्यात ३, जालन्यात २, अहिल्यानगरमध्ये २, नांदेडमध्ये ६ जागांवर आतापर्यंत विजय मिळवला आहे. मालेगाव व सोलापूरचा निकाल अजून आलेला नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शंभरपेक्षा जास्त नगरसेवक मजलिसचे यावेळी महाराष्ट्रात असणार आहेत.” छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम ३५ जागा जिंकेल, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला आहे.
