सावंतवाडी:- ​”सत्ताधारी आणि साहित्यिकांची युती निकोप समाजासाठी धोकादायक आहे. आजच्या धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचेही प्रोत्साहन मिळत आहे, हे दुर्दैवी आहे. अशा काळात व्यवस्थेला शरण न जाणारा लेखकच सकस साहित्य निर्माण करू शकतो,” असे स्पष्ट प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले.

सिंधुदुर्गचे सुपुत्र, नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे आयोजित पहिल्या ‘आंबेडकर चौक साहित्य संमेलनाचे’ ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. ​सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी वीरधवल परब प्रमुख पाहुणे म्हणून, तर प्रा. एस. एन. पाटील, संध्या तांबे, संमेलन अध्यक्ष अजय कांडर,अनिल जाधव, मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम आदी उपस्थित होते.

​अध्यक्षीय भाषणात बोलताना कवी कांडर पुढे म्हणाले की, “साहित्यिकांनी केवळ लिहून वेगळे न राहता, सामाजिक समतेसाठी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. लेखकाने इतिहासाकडे एककल्ली न पाहता, तो सामाजिक समतेचे हत्यार म्हणून वापरला पाहिजे. सिद्धार्थ तांबे यांचे लेखन याच समतेचा आग्रह धरणारे होते, त्यामुळेच हे संमेलन सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे.” ​प्रमुख पाहुणे वीरधवल परब यांनी सिद्धार्थ तांबे यांच्या साहित्यातील सामाजिक वेदना आणि त्यांच्या चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकला.

उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी पालिका प्रशासनाच्या वतीने अशा सांस्कृतिक उपक्रमांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. तसेच साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या सोहळ्यात ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांना ‘नाटककार सिद्धार्थ विष्णू तांबे लेखन’ पुरस्कार आणि अनिल जाधव यांना ‘कार्यकर्ता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच, कवी हरिचंद्र भिसे यांच्या रानफुला’ आणि समीर वेंगुर्लेकर यांच्या ‘वारसदार’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी अरुण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले. ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर मातोंडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विठ्ठल कदम यांनी केले. या कार्यक्रमास लेखिका वृंदा कांबळी, अभिनेता नंदू पाटील, श्रीराम वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे, दीपक पटेकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक यांच्यासह अनेक साहित्यिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.