अकोला : एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणात कनिष्ठ वेनतश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर व अकोट आगारातील वाहक प्रफुल्ल गावंडे यांना अकोट शहर पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. गुजरला औरंगाबाद येथून, तर गावंडेला अकोल्यातून अकोट पोलिसांनी ताब्यात घेतले.

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोट शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रकरणात न्यायालयीन कामासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० तथा ५०० रुपये जमा करण्यात आले होते. अकोट आगारातील कर्मचाऱ्यांद्वारे संकलित केलेले ७४,४०० रुपये १४ नोव्हेंबर २०२१ रोजी अकोट आगारातील वाहक प्रफुल्ल गावंडे यांनी अजयकुमार गुजर याच्या बँक खात्यात पाठवले. अजयकुमार गुजर याने २८ डिसेंबर २०२१ रोजी अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्याकडे पैसे गोळा केलेले आहेत, असे जाहीर केले. अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्या मध्यस्थीने एसटी कर्मचारी संघटनेचे अजयकुमार गुजर व अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रफुल्ल गावंडे यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांनी जमा केलेले ७४,४०० रुपये आणि इतर जमा राशी संगनमत करून स्वीकारली, अशी तक्रार विजय मालोकार यांनी दाखल केली. याप्रकरणी औरंगाबाद येथील अजयकुमार गुजर, मुंबई येथील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते, अ‍ॅड. जयश्री पाटील व अकोट येथील प्रफुल्ल गावंडे यांच्या विरुद्ध भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात औरंगाबाद येथून आज दुपारी अजयकुमार गुजर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहक प्रफुल्ल गावंडे यालाही अकोट पोलिसांनी अकोल्यातून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना उद्या न्यायालयापुढे हजर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल गावंडे याने अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन आमचीच फसवणूक झाल्याचे म्हटले. कर्मचाऱ्यांनी जमा केलेली रक्कम मी केवळ गुजर यांना पाठवली. पुढे त्यांनी त्या पैशांचे काय केले? याची कल्पना नसल्याचे गावंडे याने सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणूक प्रकरणांत अजयकुमार गुजर व प्रफुल्ल गावंडे या आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणीआवश्यकतेनुसार अ‍ॅड. सदावर्तेचाही ताबा घेण्यात येईल.

– प्रकाश अहिरे, पोलीस निरीक्षक, अकोट शहर.