सावंतवाडी : आजगाव, धाकोरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मायनिंग सर्वेक्षणाला ग्रामसभेत हरकत घेऊन नाहरकत दाखला दिला जाऊ नये, असा ठराव मंजूर करण्यात आला. सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, धाकोरे, मळेवाड तर वेंगुर्ला तालुक्यातील सोन्सुरे, आरवली, सखैलखोल, बांध या गावात जेएसडब्ल्यू कंपनीने मायनिंग करण्यासाठी मायनिंगपूर्व सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी या ग्रामपंचायतीकडून  सर्वेक्षण करण्यासाठी ना हरकत दाखलाह्ण मागितला आहे. त्यासाठी कंपनीने या ग्रामपंचायतींना पत्र दिले होते. सोन्सुरे ग्रामपंचायतीने बोलावलेल्या ग्रामसभेत मायनिंग सर्वेक्षण करण्यासाठी ना हरकत दाखला न देण्याचा ठराव दोन दिवसांपूर्वी केला होता. तसाच ठराव आजगाव- धाकोरे ग्रामपंचायतीने शुक्रवारी बोलावलेल्या ग्रामसभेत एकमताने करण्यात आला. ग्रामसभेला ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे हजेरी लावली होती. या दोन्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे हजेरी लावत सर्वेक्षण करण्यासाठी ना हरकत दाखला कंपनीला न देण्याचा ठराव करताना या दोन्ही गावांमध्ये कंपनीला कोणत्याही परिस्थितीत मायनिंग करू दिले जाणार नसल्याचा निर्धारही करण्यात आला. ग्रामसभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आजगाव सरपंच सुप्रिया वाडकर यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत जेएसडब्ल्यू कंपनीला सर्वेक्षण करण्यासाठी ना हरकत दाखला देऊ नये असे ग्रामस्थांनी एकमताने ग्रामसभेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबतचा ठराव केशव गोगटे यांनी मांडला. त्याला अनंत दिनकर पांढरे यांनी अनुमोदन दिले. सरपंच सुप्रिया वाडकर यांनी मायनिंग प्रकल्प हानिकारक आहे. यामुळे बागायती नष्ट होण्याबरोबर परिसरातील पाण्याचे स्रोत नष्ट होणार आहेत. लोकांच्या उपजीविकेचे साधनच मायनिंगमुळे हिरावुन घेतले जाणार आहे. रेडीतील मायनिंगची परिस्थिती सर्वासमोर आहे. ही परिस्थिती पाहता कंपनीला सर्वेक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला दिला जाणार नाही. तसेच कंपनीने भविष्यात मायनिंग करण्याचे ठरवल्यास त्याला ठामपणे विरोध केला जाईल असे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajgaon dhakore gram panchayats determined unite against mining survey gram sabha ysh
First published on: 25-09-2022 at 00:49 IST