Ajit Doval Lokmanya Tilak Award Speech: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी डोवाल यांनी टिळक स्मारक ट्रस्टचे आभार मानले. डोवाल यांनी यावेळी बोलताना लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली. स्वातंत्र्यलढ्यातील टिळकांच्या योगदानावर भाष्य करताना टिळकांचे बलिदान सर्वोच्च असल्याचे नमूद केले. डोवाल यांनी यावेळी त्यांचा पुण्याशी देखील संबंध असल्याचे सांगितले.

पुणे आणि लोकमान्य टिळकांबाबत डोवाल काय म्हणाले?

“पुण्याशी माझा देखील संबंध आहे. ७६ वर्षापूर्वी लष्करात असलेल्या वडिलांची पुण्यात बदली झाल्याने मीही पुण्यात आलो होता. सव्वा एक ते दीड वर्ष मी पुण्यात होता. येथे माझे शालेय शिक्षण देखील झाले आहे. प्रत्येक मंगळवारी माझी आई चतुःशृंगी मंदिरात घेऊन जायची, नैवेद्य ठेवायचो. शाळेत प्रार्थनेच्या वेळी शिक्षक मूल्यशिक्षणावर व्याख्यान द्यायचे. लोकमान्य टिळकांबाबत मी वयाच्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा ऐकलं, त्यानंतर आता ७६ वर्षांनी पुण्यातच त्यांच्याच नावे पुरस्कार मिळतोय हे मी माझं सौभाग्य समजतो, मी कल्पना देखील करु शकत नाही”, असे अजित डोवाल म्हणाले.

इतिहासातील परिस्थितीचा उल्लेख

“लोकमान्य टिळकांचे योगदान समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल, तो काय काळ होता हे समजून घ्यावं लागेल. आजकाल हक्कांबाबत बोलणाऱ्यांना हे समजून घ्यावं लागेल की या हक्कांचा गैरवापर केल्यास त्या लोकांच्या मनाला किती वाईट वाटेल याचा विचार करायला हवा.” भारतेंदु हरिश्चंद्र यांच्या भारतदुर्दशा नाटकाचा संदर्भ यावेळी डोवाल यांनी दिला. “या पुस्तकात हरिश्चंद्र यांनी भारताचे वर्णन केले आहे. अनेक अत्याचार, वाईट स्थिती या विरोधात आवाज उठविण्याचे कोणात धाडस नव्हते. देशात विविध भागात आंदोलन व्हायला लागली, आक्रोश दिसायला लागला महाराष्ट्रात याचे नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलं. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि मी तो मिळवणारच, ही केवळ घोषणा नव्हती तर देशातील नागरिकांमध्ये स्फुलिंग निर्माण करणारी उद्घोषणा होती”, असे डोवाल म्हणाले.

पंतप्रधान मोदी – अमित शाहांचे कौतुक

यावेळी अजित डोवाल यांनी देशाला प्रगत, विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवं, यासाठी एकजूट होऊन काम करण्याचा संकल्प करायला हवा, असे आवाहन केलं. एखादी गोष्ट स्वत:च्या स्वार्थासाठी असेल आणि देश हिताच्या नसेल तर ती टाळायला हवी, असेही डोवाल म्हणाले. डोवाल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांचे कौतुक केले. देशाच्या नेतृत्वाकडे देशाला विकसित करण्याचा स्पष्ट दृष्टीकोन असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, नेतृत्व देशात विकसित होण्याच्या दिशेने घेऊन जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.