Ajit Pawar Accident conspiracy claims by Sharmila Thackeray : अजित पवारांचा अपघात धुक्याने झाला की, धोक्याने झाला, हे महाराष्ट्राला कळले पाहिजे. या प्रश्नावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलले पाहिजे, त्या गप्प का ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. हाच सवाल राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही उपस्थित केलाय. त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषा दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनात माध्यमांशी बोलत होत्या.
राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याबाबत माध्यमांनी शर्मिला ठाकरे यांना विचारलं. त्यावर त्या म्हणाले, “अजित पवारांच्या अपघाताबाबतचे व्हिडिओ अनेक चॅनेल्सने दाखवले. तिथे कुठेही धुकं नव्हतं. तिथल्या एका माणसाने तिकडचा एक शेवटचा व्हिडिओही काढला. त्यातही दिसतंय की विमान तिरकं होऊन पडलंय. विमान लँड झालंच नव्हतं.”
“त्यामुळे विमान अपघात कशामुळे झालाय, हे पाहिलं पाहिजे. एवढा मोठा माणूस अपघातात जातो, त्याचा साधा एफआयआरलही घेत नाहीत? रोहित पवार कोणावरही आरोप करत नाहीत, मग पोलीस का घाबरत आहेत? तुम्ही एफआयआर तर घ्या ना.. त्यांनी कोणत्याही माणसावर आरोप केलेले नाहीत”, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
“अजित पवार यांच्या विमान अपघातावरून संशय वाढला आहे. अपघात धुक्याने झाला की, धोक्याने झाला, असा संशय निर्माण होत आहे. सरकारी दबावामुळे अजित पवार यांच्या सारख्या नेत्याच्या अपघाताबाबत तक्रार नोंदवून घेतली जात नसेल सामान्यांचे काय. मरीन ड्राईव्हला पोलिस तक्रार नोंद करून घेत होते, तितक्यात पोलिस उपायुक्त तिथे आले आणि त्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. तक्रार नोंद करून घेऊ नका, असा सरकारकडून दबाव का येतो. तक्रार नोंदवून का घेतली जात नाही, सरकार तक्रार नोंद करू का करू देत नाही, सरकार एफआयआरला का घाबरते, याचे उत्तर सरकारने द्यावे, असं राज ठाकरे म्हणाले.
अपघात प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलले पाहिजे. त्या गप्प का. अपघात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी रोहित पवार यांची अपेक्षा असेल तर त्यात गैर काय. सरकारने रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली पाहिजेत. विमानाचे कितीही नुकसान झाले तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. मग या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाला, असे का सांगितले जाते. अपघात प्रकरणी राज्य सरकारच संशयाची भुते नाचवित आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
