राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (६ एप्रिल) शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला काही सूचनाही केल्या. पोलीस दलाची मान खाली जाईल, असं काम पोलिसांनी करू नये, असा सल्ला अजित पवार यांनी शिर्डीत बोलताना दिला.

अजित पवार म्हणाले, “पोलिसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही. पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खाली जाईल असे काम पोलिसा़ंनी करू नये.”

“मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना शब्द देतो की…”

“देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्यांचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलिसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमांना ८६० कोटी उपलब्ध करून दिली आहेत. मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना असा शब्द देतो की या निधीत जूलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल,” असेही अजित पवार या़ंनी सांगितले.

“गुन्हे कमी झाल्यास राज्याचे उत्पन्न वाढते”

अजित पवार म्हणाले, गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनीही एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. गुन्हे कमी झाल्यास राज्याचे उत्पन्न वाढते. जिल्हा नियोजनामधून पोलिसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील.

शिर्डी विमानतळ विकासासाठी १५० कोटी

शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कॉर्गा टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील. यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे.

हेही वाचा : …तर पुढच्या वर्षी तिथं कोयता पडणार नाही : अजित पवार

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस उप महानिरीक्षक डॉ.बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील मंचावर उपस्थित होते.