अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शेती, माती, सहकार आणि ग्रामीण भागाशी अतूट नातं असलेलं राजकीय नेतृत्व हरपल्याचे म्हटले जाते. बारामतीत अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कारासाठी लाखोंचा जनसमुदाय एकवटल्यावर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. पण, हा जनाधार जादुची कांडी फिरवून, सोशल मिडियावर पेड प्रमोशन करून किंवा फ्लोअर्स वाढवून मिळालेला नक्कीच नाही. अजित पवार १९८२ साली श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून गेले. त्यानंतर मृत्यूने गाठेपर्यंत दादा लोकांमध्ये होते. त्यांनी केलेल्या कामांची ती पोचपावती होती.

अजित पवार राजकारणात येण्यापूर्वी गायींचा गोठा, डेअरी आणि पोल्ट्री व्यवसाय करीत होते. ऊस तुटून गेल्यावर जनावरांसाठी उसाचे वाडे, उन्हाळ्यात ज्वारीचा कडबा गोळा करताना अनेकांनी अजित पवारांना पाहिले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्या आठवणींना उजाळा दिला आहे. अत्यंत सडेतोड, फटकळ बोलणाऱ्या या माणसामागे असे मोहोळ का जमा झाले असावे, असा प्रश्न पडतो. हा माणूस कधी सडेतोड किंवा फटकळ होता, हे काही घटनांमधून पाहू.

पहिला घटना आहे. कराडचे बाळासाहेब पाटील सहकार मंत्री असतानाची. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी आपल्या कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी सहकार विभागाकडे अर्ज केला होता. अर्ज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आला. पण, काही कारणांमुळे त्याला मंजुरी मिळाली नाही. श्रीनिवास पवार यांनी दादांना फोन करून माझी फाईल सहकार विभागाकडे पडून आहे, तेवढी मंजूर करून दे, असा निरोप पाठविला होता. कॅबिनेट बैठकी अगोदर पवारांनी मंत्री बाळासाहेब पाटील यांना बोलावून घेतले. ती श्रीनिवासच्या कारखान्याची फाईल का अडवून ठेवली आहेस, असे थेटच विचारले.

पाटील यांनी काहीसे अडखळत फाईलमध्ये थोडी अडचण असल्याचे सांगितले. मंत्री पाटील यांना आपल्याच नेत्याच्या भावाच्या कारखान्याच्या विस्ताराला मंजुरी देण्यात काही अडचणी आहेत, हे स्पष्टपणे सांगता येईना. त्याचे खासगी सचिव तिथेच उपस्थित होते. सहकारातील जाणकार असलेल्या या सचिवांनी विस्तारीकरणाला मंजुरी देताना आपण काही निकष ठरविले आहे. त्यात एफआरपीची रक्कम पूर्णपणे देण्याची मुख्य अट आहे. श्रीनिवास पवार यांच्या कारखान्याकडे ५४ कोटी रुपयांची एफआरपी बाकी आहे, असे सांगून टाकले. दादांनी तत्काळ बंधू श्रीनिवास यांना फोन लावला आणि सांगितले, एफआरपीची देय असलेली रक्कम पूर्णपणे चुकती कर आणि फाईल पुन्हा पाठव, त्यानंतरच मंजुरी मिळेल. माझा भाऊ आहे, मंजुरी द्या, माहिनाभरात देईल एफआरपीची रकक्कम, असेही त्यांना म्हणता आले असते. पण तसे अजित पवारांनी केले नाही. आपल्या बंधूसाठी नियम मोडला नाही. अजित पवारांच्या कामाची पद्धत इतकी सरळ होती.

दुसरा प्रसंग आहे, बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांतून फिरतो आहे. बाजार समितीच्या पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी रुपयांवर गेल्याचे पाहून अजित पवार संतापले. जाहीर सभेत तुला जेलमध्ये टाकीन. तू इतक्या उधारी कशी केलीस. तुला कोणी सांगितले उधार पेट्रोल, डिझेल द्यायला. कुणाही सांगितले तरी उधार तेल द्यायचे नाही. मी सरकारकडून पैसे आणतोय आणि तुम्ही असा पैशांचा नास करताय, हे चालणार नाही. उधारी तत्काळ वसूल झाली पाहिजे, असा दमच त्यांनी दिला.

पुणे जिल्हा बँकेवर वर्षांनुवर्षे त्यांची सत्ता आहे. पण, मार्चअखेर आली की, मोठ्या कर्जदारांना ते स्वतः फोन करून थकबाकी भरायला सांगत आणि त्यांच्याशी संबंधित असलेले बडे थकबाकीदारही निमूटपणे थकबाकी भरत असत. अजित पवारांनी अशा कडक शिस्तीत सहकार जगविला, वाढविला आणि मोठा केला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे, मी कधीही म्हंटले नव्हते. शेतकऱ्यांनी कर्ज रक्कम भरली पाहिजे. वीजबिल वेळेत भरले पाहिजे, फुकटची सवय शेतकऱ्यांना लावू नका, असा आग्रह त्यांनी सतत धरला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारला आर्थिक अडचणीत आणणारी आहे. ती बंद करा, अशी भूमिका घेणारे अजित पवारच होते.

बारामतीत सध्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना एक चांगला सल्ला दिला. सरकारी विकासकामांना जमिनींचे संपादन झाल्यानंतर आता तुमच्याकडे पैसे आले आहेत. त्यातील काहींनी आपल्या पत्नीला उभे केले आहे. जमिनीचा मोबदला म्हणून आलेले पैसे वाटतो आहेस. पैसे संपल्यावर हाता चुना लावून टो-टो बोंबलणार आहेस का. पैसे जपून वापरा, पोरांना चांगलं. शिकवा. कुठलही व्यसन करू नका, राजकारण लय वंगाळ आहे, असे अजित पवार सातत्याने सागंत असतं.

त्यांच्या सडेतोड, फटकळ स्वभावात एक पालक, एक नेतृत्व आणि पुढारी लपला होता. राजकारणात काम करीत असताना त्यांच्यातील हळवा माणूस अधूनमधून समोर यायचा. शेती, सहकार आणि पशूसंवर्धन ही त्यांची आवडीची क्षेत्रं होती. त्यांना त्याची जाण होती. त्यातील अडचणी, प्रश्नांची जाण होती. म्हणून सर्वसामान्य माणूस थेट त्यांच्याकडे जात असे. त्यांनी कधी कुणाला झुलवत ठेवले नाही. काम होणार असेल तर होईल, मी करतो, असे थेट सांगत. होणार नसेल तर कुणाकडे हेलपाटे मारू नकोस, तुझे काम कुणीही करू शकणार नाही, असेही सांगण्यास मागे- पुढे पाहत नसत. असा हा शेती, सहकार क्षेत्राची जाण असलेला खऱ्याअर्थाने लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या तोलामोलाचा नेता पुन्हा होणार नाही. म्हणून त्यांच्या जाण्याने शेती, सहकार, गावगाड्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. गावगाड्याचे प्रश्नही मुके, बहिरे झाले आहेत.

dattatray.jadhav@expressindia.com