विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत आला? एएआयबीचा अंतिम रिपोर्ट कधी येईल? या घटनेचा तपास किती आणि कोणत्या तपास यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे? याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना सांगितली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“एका अतिशय महत्वाच्या विषयावर अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये चर्चा झाली. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेच्या तपासासंदर्भात चर्चा झाली. आधी मी हे स्पष्ट करू इच्छितो की दोन प्रकारे तपास सुरू आहे. सीआयडी देखील तपास करत आहे आणि AAIB देखील तपास करत आहे. मात्र, एक मुद्दा असाही उपस्थित करण्यात आला की, सीबीआय का तपास करत नाही? पण सीबीआयने हे स्पष्टपणे सांगितलं की एएआयबीचा जो रिपोर्ट आहे तो महत्वाचा आहे. एएआयबीचा जो रिपोर्ट येईल, तो आल्यानंतरच आम्ही तपास घेऊ शकतो, त्याआधी आम्ही तो तपास काही घेणार नाही. त्यामुळे आपण एएआयबीच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत”, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली आहे.

“अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेचा सीआयडीने जो काही तपास केला, त्या तपासात काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींबरोबर एक शंका ही पायलट सुमित कपूर यांच्याबद्दलही होती. त्यांची बँक खाती, इन्शुरन्स पॉलिसी, शेअर मार्केटमधील गुंतवणूक हे सगळं तपासण्यात आलं. पण त्यामध्ये कुठेही काहीही संशयास्पद आढळून आलं नाही. तसेच जेवढे फुटेज आहेत, ते सर्व मिळवलेले आहेत. त्याचंही विश्लेषण केलं आहे. जे काही उपलब्ध साक्षी पुरावे आहेत ते तयार केलेले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली.

एएआयबीचा रिपोर्ट कधी येईल?

“यामध्ये एएआयबीचा रिपोर्ट महत्वाचा आहे. त्याबाबतची माहिती देखील मी घेतली असता सांगण्यात आलं की काही डॉक्युमेंट आणि डेटा डाऊनलोड करायचा होता, तो १०० टक्के डाऊनलोड झाला आहे. त्यामध्ये कुठलीही अडचण नाही. जो ब्लॅक बॉक्स आहे तेही सगळं झालेलं आहे. आता एक प्राथमिक रिपोर्ट त्यांनी आपल्यासमोर आणलेला आहे. मी याबाबत केंद्र सरकारशी देखील चर्चा केली. केंद्र सरकार, मंत्रालय आणि मंत्री महोदयांना मी विचारलं की साधारण हा सर्व रिपोर्ट किती दिवसांत येईल? तेव्हा मला त्यांनी सांगितलं की जानेवारीच्या पूर्वी अंतिम रिपोर्ट येईल”, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

‘रोहित पवार म्हणाले तसं…’

“जसं काल रोहित पवार म्हणाले की कधी-कधी तीन ते चार वर्ष लागतात, ते खरं आहे. पण या केसमध्ये केंद्र सरकारने विनंती केलेली आहे. कारण सगळे परदेशातले तज्ञ यामध्ये घेतले आहेत. अमेरिकेतली एक एजन्सी देखील यामध्ये घेतलेली आहे. आपण दुर्देवाने असं म्हणू नये, पण दादांच्या पुण्यतिथी आधी हा रिपोर्ट यावा असा प्रयत्न आहे. हा रिपोर्ट आल्यानंतर सीबीआय असेल किंवा सीआयडी. आता सीआयडी देखील त्या रिपोर्टसाठी अडकली आहे. कारण वर आकाशात काय घडलं? हे या रिपोर्टशिवाय समजू शकत नाही, ते धागेदोरे यामध्ये मिळणार आहेत”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना म्हटलं आहे.

“आता एक मुद्दा मांडण्यात आला की आम्ही कर्नाटकात एफआयआर केला, तो तुम्ही सीआयडीला पाठवून दिला. मी आता पुन्हा एकदा सांगतो की, एफआयआरनंतरची प्रोसेस काय असते? तर चार्जशीट करणं. एफआयआर दाखल झाल्यानंतर कोण दोषी आहे हे तुम्हाला फायनल करावं लागतं आणि त्यावर चार्ज फ्रेम करावं लागतो. तर त्या एफआयआरला अर्थ असतो. पण तो चार्ज फ्रेम करण्यासाठी आधी तुम्हाला नेमकं दोषी कोण आहे हे ठरवावं लागेल. आता ते जोपर्यंत एएआयबीचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत तुम्ही ठरवू शकत नाही. शेवटी भावना महत्वाची आहे, पण कायदा भावनेने चालत नाही. उद्या कोर्टात गेलो तर एका मिनिटांत कोर्ट सांगेल की तुम्ही असं कसं केलं. मग आपल्याला चपराक बसेल. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, या प्रकरणातील सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.