scorecardresearch

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस नाही ; अजित पवार यांनी मागणी फेटाळली

धानाची लागवड केल्याच्या प्रमाणात काही प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत विचार सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई: धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी रुपये तात्काळ देण्यात येतील. मात्र यंदा धान खरेदीवर शेतकऱ्यांना बोनस दिला जाणार नसल्याचे सांगत उपमख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांची मागणी सोमवारी फेटाळून लावली.

विधानसभेत वैभव नाईक, सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याच्या माध्यमातून धान खरेदीचा मुद्दा उपस्थित करीत शेतकऱ्यांच्या बोनसची मागणी केली. सरकारने धान खरेदी सुरु केली आहे, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत आहे. मात्र या वर्षीचा बोनस मिळालेला नाही. तो बोनस द्यावा, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली. तर राज्यात सन २०१३ पासून शेतकऱ्याना धान खरेदीवर बोनस देण्याची पद्धत सुरू आहे. ती कायम ठेवावी अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. त्यावर मागील धान खरेदीपोटीचे शेतकऱ्यांचे शिल्लक ६०० कोटी लगेच देण्यात येतील असे पवार यांनी सांगितले. मात्र बोनसची मागणी फेटाळताना यातूून केवळ शेतकऱ्यांची फसवणूक होते. शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसड राज्यातील व्यापारी राज्यात येऊन शेतकऱ्यांच्या नावाने धान विकून बोनस घेऊन जातात. राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांना त्यांनी धानाची लागवड केल्याच्या प्रमाणात काही प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत विचार सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar announced rs 600 crore package for paddy growers zws

ताज्या बातम्या