scorecardresearch

गोळीबार करून दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का?, अजित पवारांचा सरकारला सवाल

या गोळीबाराच्या घटनेमुळे मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. नातेवाईकांकडून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

ajit pawar
अजित पवार

मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मोरणा येथे गोळीबार केलाय. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला, तर एक जण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरून गोळीबार करून दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का?, असा संतप्त सवाल करून राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले.

या गोळीबाराच्या घटनेमुळे मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. नातेवाईकांकडून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात मदन कदम आणि त्यांच्या दोन मुलांना अटक केली असली तरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

१५ मार्च रोजी ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा मोरणा परिसरात अपघात झाला होता. अपघातावेळी त्यांची स्थानिकांशी बाचाबाची झाली होती. त्यानंतरही दोन-तीन दिवसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि कदम यांच्यात वादावादी झाली होती. याचा राग मनात धरून रविवारी रात्री ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने मोरणा भागात बेछुट गोळीबार केला. गोळीबारावेळी आरोपी मदन कदम याच्यासोबत त्याची दोन मुलेसुद्धा होती. ही घटना मदन कदम यांच्या गुरेघर येथील फार्महाऊसवर घडल्यानं ते अडचणीत सापडले आहेत. मृत व्यक्ती या गुरेघरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरडेवाडी गावातील आहेत.

चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून मदन कदम आणि कोरडेवाडी गावातील लोकांसोबत वाद झाला होता. श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यासह काही गावकरी मदन यांना जाब विचारण्यासाठी गेले असता मदन याने बेछूट गोळीबार केल्याचं समजतंय. गोळीबारानंतर दोन्ही मृतदेह हे रक्ताच्या थारोळ्यात सुमारे दोन तास पडले होते. पोलिसांनी येऊन हे मृतदेह ताब्यात घेतले. तसेच तेथील एका सोसायटीची निवडणूक आणि पवनचक्कीचे प्रलंबित पेमेंट हा विषयसुद्धा या गोळीबाराच्या पाठीमागे आहे. या घटनेत मृत व्यक्तींमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांचा कार्यकर्ता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 13:41 IST

संबंधित बातम्या