आज (शुक्रवार) सकाळी अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सिंचन घोटाळ्याची चौकशी तसेच खर्चाची कारणमीमांसा करण्यासाठी राजीनामा देत असल्याचे जाहीर करत अजित पवार यांनी २५ सप्टेंबरला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीच्या सर्व बड्या नेत्यांसह अजित पवारांतचे कुटुंबियही या शपथविधीला उपस्थित होते. मात्र, सुरेश शेट्टी आणि माणिकराव ठाकरे यांच्याव्यतिरिक्त कॉंग्रेसचे बडे नेते या शपथविधीला गैरहजर होते.
दरम्यान, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची नैतिक अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र सादर करण्यात आले होते. बुधवारी रात्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
अवघ्या अडीच महिन्यांत अजित पवार सत्तेच्या वर्तुळात परतत आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल सिंचनाच्या श्वेतपत्रिकेत अवाक्षरही काढण्यात आलेले नसले तरी त्यात ‘क्लीन चिट’ मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला व त्यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला.
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन तो स्वीकारणे अजित पवार यांनी पक्षाच्या नेतृत्वाला भाग पाडले होते. अजितदादांच्या राजीनाम्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पसंत पडला नव्हता हे त्यांच्या वक्तव्यावरून तेव्हा स्पष्ट झाले होते.