Ajit Pawar on Sushil Kedia statement: आर्थिक बाबींवर मार्गदर्शनपर सल्ले देणारे व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आणि काही वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देत मराठी येत नसल्याचे सांगितले. तसेच मनसेकडून मराठी बोलण्याबाबत केला जात असलेल्या आग्रहाबाबत निषेध व्यक्त केला. सुशील केडियांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या टिप्पणीबद्दल अनेक राजकीय नेत्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

सुशील केडिया काय म्हणाले होते?

सुशील केडियांनी केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंच्या मराठी भाषेच्या आग्रहावर टीका केली होती. मराठी शिकणार नाहीच, अशी भूमिका सुशील केडिया यांनी व्यक्त केली. “राज ठाकरे, याची नोंद घ्या की, मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचे यासंदर्भातले बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला”, असे केडियांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अजित पवार काय म्हणाले?

व्यावसायिक सुशील केडिया यांच्या पोस्टबद्दल प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. ते म्हणाले, “माध्यमांनी कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावे, यालाही काही मर्यादा आहेत. संविधान, कायदा याप्रमाणे ते (केडिया) भारतीय नागरिक आहेत. भारतीय नागरिकाला कुठल्याही भागात जाऊन राहता येते, बोलता येते. व्यवसाय करता येतो किंवा जमीन खरेदी करता येते.”

“एखाद्या व्यक्तीने काही म्हटले असेल तर त्याला एवढे रंगवून सांगायची काय गरज आहे का? मुंबईत असे अनेक लोक राहतात, ज्यांना दुर्दैवाने मराठी येत नाही. एखाद्या व्यक्तीला जर मराठी भाषा बोलताच येत नसेल तर तो येत नाही असे म्हणणारच ना… सर्वांना मराठी समजले पाहीजे किंवा मराठी भाषा बोलली गेली पाहीजे, असे मराठी माणसांना वाटणे चुकीचे नाही”, असेही अजित पवार म्हणाले.

त्यांना मराठी कशी येणार?

“केंद्र सरकारच्या काही कर्मचाऱ्यांची देशभरात बदली होत असते. एखादा अधिकारी तमिळनाडूहून मुंबईत आला तर त्याला ताबडतोब मराठी कशी येणार? आपण भारतीय आहोत, ही भावना आपण मनात ठेवली पाहिजे. बाहेरच्या राज्यातील माणूस इथे व्यवसाय किंवा नोकरी करत असेल तर त्याने स्थानिक भाषा शिकावी, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. पण त्यावर बळजबरी करता येणार नाही”, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदींमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला

“आपला देश अनेक जाती-धर्म-पंथात विखुरलेला देश आहे. अनेक भाषा आपल्या देशात बोलल्या जातात. प्रत्येक राज्याची मातृभाषा आहे. आपल्या मातृभाषेला म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी अनेक वर्ष आपण प्रयत्न करत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयात लक्ष घालून मागच्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला”, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.