Ajit Pawar : अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये शरद पवारांना आव्हान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ होता बारामती. कारण बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना होता. पवारांच्या घरातील एक मुलगी आणि एक सून एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्या. या निवडणुकीत सुप्रिया सुळे निवडून आल्या. लोकसभेचा निकाल लागून दोन महिने झाले आहेत ज्यानंतर अजित पवार यांनी एक आश्चर्यकारक कबुली दिली आहे. लोकसभेला झालेली चूक अजित पवारांनी ( Ajit Pawar ) मान्य केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी नेमकं काय घडलं? जुलै २०२३ या महिन्यात अजित पवारांनी थेट त्यांचे काका आणि राजकीय गुरु शरद पवार यांनाच आव्हान दिलं. तुमचं आता वय झालं आहे, तुम्ही आम्हाला सल्ला द्या, मार्गदर्शन करा आमचं काही चुकलं तर सांगा पण आता आराम करा. असं म्हणत शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी असंच त्यांनी सुचवलं होतं. २ जुलै २०२३ रोजी अजित पवार ( Ajit Pawar ) महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर ५ जुलै रोजी केलेल्या भाषणात त्यांनी शरद पवारांवर खूप टीका केली. तसंच त्यांच्या भूमिका बदलण्याचा आपल्याला कसा वारंवार त्रास झाला हे देखील सांगितलं. ज्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. शरद पवारांबरोबर काही मोजके लोक राहिले आणि अजित पवारांसह ४१ आमदार आले. अशात लोकसभा निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची जागा तर निवडून आणलीच शिवाय आठ खासदारही निवडून आणले. ज्यानंतर पवारांची पॉवर काय ते महाराष्ट्राने पुन्हा पाहिलं. आता अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा जो सामना लोकसभेला झाला तो व्हायला नको होता असं म्हटलं आहे. त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे. हे पण वाचा- Sanjay Raut : संजय राऊतांचं अजित पवारांबाबत मोठं भाकित, थेट आमदारकीच जाणार? म्हणाले, “बारामतीमधून…” शरद पवारांकडून पक्षाचं नाव गेलं, चिन्हही गेलं. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह दोन्ही अजित पवारांना दिलं. मात्र तरीही तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव हे यावर शरद पवारांंनी लोकसभेला सामोरं जाण्याचं ठरवलं. लोकसभेत काय झालं ते महाराष्ट्राने पाहिलं आहेच. राष्ट्रवादी फुटल्याचा सर्वात मोठा फटका हा अजित पवारांना बसला आहे. आता अजित पवारांनी ( Ajit Pawar ) बारामतीच्या जागेबाबत सुनेत्रा पवारांनी उमेदवारी द्यायला नको होती असं म्हणत आपली चूक मान्य केली आहे. काय म्हणाले अजित पवार? "सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं." असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 'जय महाराष्ट्र' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना अजित पवारांनी ही आश्चर्यकारक कबुली देत आपली चूक मान्य केली आहे.