Ajit Pawar On Sharad Pawar : विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून आढावा बैठका आणि सभा घेत आगामी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांची आणि मतदारसंघाची चाचपणी सुरु असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. असं असतानाच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक विधान करत ‘सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून निवडणूक लढवायला सांगणं ही आपली चूक होती’, असं म्हटलं होतं. अजित पवारांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा रंगल्या.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २ जुलै २०२३ रोजी फूट पडली. त्यानंतर अजित पवार हे महायुतीबरोबर तर शरद पवार हे महाविकास आघाडीत आहेत. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असतो. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले होते की, यासंदर्भातील निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील नेते एकत्र मिळून घेतील. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एएनआय या वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नावर अजित पवारांनी फक्त दोन शब्दांत उत्तर दिलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी फक्त दोन शब्दांत दिलं. अजित पवार म्हणाले, “नो कमेंट्स.”, असं फक्त दोन शब्दांमध्ये उत्तर देत अजित पवार यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं.
अजित पवार पुढे म्हणाले, “मी आता महायुतीमध्ये आहे आणि महायुतीचाच प्रचार करत आहे. मी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही आता लोकांना सांगत आहोत. महायुतीत येण्याची संधी आम्हाला मिळाली तेव्हापासून प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात आम्ही काय-काय काम केलं? काय विकास केला? हे आम्ही जनतेला सांगण्याचं काम करत आहोत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मला असं वाटतं की, जे काही थोडसं काम बाकी राहिलं असेल त्या कारणामुळे काही मतदार आमच्याबरोबर आला नाही. मात्र, आता आम्ही जनतेला आमच्या कामाबाबत समजून सांगण्याचं काम करत आहोत”, असंही अजित पवार म्हणाले.