नाना पटोले यांची राष्ट्रवादीविरोधात सोनिया गांधींकडे तक्रार, अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांच्या नेत्यांना…”

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसमधील वाद वाढला आहे.

ajit pawar slams nana patole
अजित पवार आणि नाना पटोले (संपादित छायाचित्र)

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसमधील वाद वाढला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नाना पटोले यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. त्याला फार महत्त्व देण्याचं काही कारण नाही,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते सोमवारी (१६ मे) कराडमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

अजित पवार म्हणाले, “नाना पटोले यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्याला फार महत्त्व देण्याचं काही कारण नाही. आम्ही पण पक्षात काही झालं तर शरद पवारांना, मुख्यमंत्र्यांना सांगतो. हे चालत आलंय, ही परंपरा आहे. हे चालत असतं. आपल्या देशाने २४ पक्षांचं एनडीए सरकार बघितलं आहे. अनेक पक्षांचं यूपीए सरकार पाहिलं आहे. मागे १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडी सरकार बघितलं आहे. त्याहीवेळी भांड्याला भांडं लागतं.”

हेही वाचा : “… आणि पटोलेंनी राष्ट्रवादीला धोका दिला”, NCP ने काँग्रेस-भाजपा युतीचा इतिहासच केला जाहीर

“…तर तीन कुटुंबांमध्ये भांड्याला भांडं लागणारच”

“एका कुटुंबात भांड्याला भांडं लागतं, तर तीन कुटुंबांमध्ये भांड्याला भांडं लागणारच ना. अशावेळी तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी भांड्याला भांडं लागू नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. नीटपणे सरकार चालवलं पाहिजे,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.

नाना पटोले यांचे राष्ट्रवादीवर नेमके आरोप काय?

“भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे,” असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसेच याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवालही नाना पटोले यांनी केला होता.

नाना पटोले म्हणाले, “भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरवले होते. ३० जानेवारी २०२२ रोजी या बाबतचे पत्र तिन्ही पक्षांनी काढले होते. त्यावर माझ्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.”

“राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले”

“महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मी सातत्याने संपर्क साधला. त्यांच्याशी भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले आणि ऐनवेळी भाजपासोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“आम्हाला अंधारात ठेवून भाजपसोबत हात मिळवणी”

“जयंत पाटील यांनी मी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला होता हे मान्य केले आहे. त्यांना भाजपसोबत जायचे आहे हे त्यांनी अगोदरच सांगितले असते तर आम्हाला काही अडचण नव्हती, पण आम्हाला अंधारात ठेवून भाजपसोबत हात मिळवणी केली याचे दुःख आहे,” असं म्हणत पटोलेंनी त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली.

“दगाफटका खपवून घेणार नाही, राष्ट्रवादीबाबत पक्षश्रेष्ठींना सांगणार”

नाना पटोले पुढे म्हणाले, “प्रामाणिकपणे मैत्री करणे आणि मैत्री निभावणे ही काँग्रेसची भूमिका आहे. आम्ही कायमच आघाडी धर्म पाळला आहे. आम्ही समोरून लढतो पाठीमागून वार करत नाही. माझ्यावर टीका करणाऱ्यांची पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे. त्याबाबत मी काही बोलण्याची गरज नाही. गेली अडीच वर्ष सत्तेत सोबत राहून राष्ट्रवादीने आम्हाला कशी वागणूक दिली या संदर्भात मी पक्षश्रेष्ठींना अवगत करणार आहे.”

हेही वाचा : राष्ट्रवादीने पाठीत सुरा खुपसला म्हणणाऱ्या नाना पटोलेंना जयंत पाटलांनी दिलं उत्तर; म्हणाले, “एकला चलो…”

“आम्ही परिणामाची चिंता करत नाही”

“दगाफटका खपवून घेणार नाही. आम्ही कधीही सत्तेसाठी लांगूनचालन केले नाही. परिणामांची चिंता करायला काँग्रेस सक्षम आहे. आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो. काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाची आणि विचारांची लढाई लढत आहे. आम्ही परिणामाची चिंता करत नाही,” असं म्हणत पटोले यांनी राष्ट्रवादीला इशारा दिलाय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar comment on complaint of nana patole to sonia gandhi pbs

Next Story
अहमदनगर: पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या बिबट्याला वन कर्मचाऱ्यानं दिलं जीवदान, पाणी पाजतानाचा VIDEO व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी