विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना “मला गृहमंत्री व्हायला आवडलं असतं, पण मिळालं नाही. आता काय करता,” असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा रंगली. याबाबत माध्यमांनी थेट अजित पवार यांनाच विचारणा केली. यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी माझ्या कार्यकर्त्यांना गमतीने म्हटलं होतं,” असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. ते शुक्रवारी (२४ सप्टेंबर) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “माझे कार्यकर्ते सारखे म्हणत होते की गृहमंत्रीपद तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे. म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना गमतीने म्हटलं की मलाही पाहिजे होतं, पण नाही मिळालं. आता काय करता.”

“ते वक्तव्य माध्यमांसाठी नाही, तर कार्यकर्त्यांसाठी होतं”

“सभेत जेव्हा लोक थकून रेंगाळतात तेव्हा सभेत बदल होण्यासाठी तसं बोललो होतो. मात्र, ते वक्तव्य माध्यमांसाठी नव्हतं तर माझ्या कार्यकर्त्यांसाठी होतं. तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न होता. आमच्या वरिष्ठांनी कुठला विभाग कुणाला द्यावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“या सरकारमध्ये अनेकजण नाईलाजास्तव एक एक दिवस ढकलत आहेत”

अजित पवार पुढे म्हणाले, “आत्ता पण बघा, हे जे सरकार आलं आहे, त्यात अनेकांना वेगवेगळे विभाग पाहिजे होते, पण त्यांना नाही मिळाले. नाईलाजास्तव त्यांना ते विभाग घ्यावे लागले आणि आता एक एक दिवस ढकलत आहेत.”

हेही वाचा : खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो व्हायरल, अजित पवार म्हणाले, “मुलं, सुना, भाऊ…”

“जे खातं मिळालं त्यात मी समाधान मानून काम केलं”

“मी सरकारमध्ये १९९१-९२ पासून काम करतो आहे. तेव्हापासून मला जी खाती मिळाली त्यात मी समाधान मानून काम केलं. १९९९ पासून आजपर्यंत ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या पार पाडण्याचा मी प्रयत्न केला. शेवटी सगळीच खाती महत्त्वाची असतात. तुम्ही त्या खात्यात किती आवडीने काम करता ते महत्त्वाचं असतं,” असंही त्यांनी नमूद केलं.