दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उठून गेलेले दिसले. त्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. हे सर्व तर्कवितर्क अजित पवार यांनी फेटाळले आहेत. “मी वॉशरुमलाही जायचं नाही का?” असा मिश्किल सवाल केला. तसेच माध्यमांनी वस्तुस्थितीवर आधारित बातम्या द्याव्यात, असा सल्ला दिला. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) विधानभवनातील वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “राष्ट्रादी काँग्रेसचं दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रविवारी (११ सप्टेंबर) दिल्लीत पार पडलं. एक विस्तारीत कार्यकारणी होती त्याची बैठक शनिवारी (१० सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता सुरू झाली आणि रात्री नऊ ते १० वाजेपर्यंत चालली. नंतर खुलं अधिवेशन होतं, ते रविवारी १० दुपारी तीन वाजेपर्यंत होतं. त्या पद्धतीने ते झालं.”

“माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला”

“या अधिवेशनात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची पुढील धोरणं आणि पुढील वाटचालीबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांनी राज्याची भूमिका मांडली. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते आणि प्रांताध्यक्ष बोलणं अपेक्षित असतं. त्यामुळे मी तेथे बोलणं टाळलं. परंतु माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

“अधिवेशनात बोलू नका असं मला कुणीही सांगितलं नव्हतं”

ते पुढे म्हणाले, “वास्तविक राष्ट्रीय अधिवेशनात बोलू नका असं मला कुणीही सांगितलं नव्हतं. मीच माझी भूमिका घेतली. मी एकटाच बोललो नाही असं नाही. तसं बघितलं तर सुनिल तटकरे वेळेअभावी बोलू शकले नाही. त्याचबरोबर वंदना चव्हाण यांचंही नाव होतं. त्याही वेळेअभावी बोलू शकल्या नाहीत. याशिवाय आणखी दोन तीन राज्यांचे प्रतिनिधी तेथे आले होते, तेही बोलू शकले नाही.”

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला अंगणवाडी सेविकांना हजर राहण्याचे आदेश, अजित पवार म्हणाले, “गर्दी जमवण्यासाठी ही वेळ आली असेल तर…”

“मी वॉशरुमलाही जायचं नाही का?”

“मी नंतर मराठी माध्यमांशी चर्चा केली. त्यांना साधारण काय झालं ते सांगितलं. मी मध्ये वॉशरुमला बाहेर गेलो, तरी अजित पवार बाहेर केले म्हणून कारण नसताना चर्चा करण्यात आली. मी वॉशरुमलाही बाहेर जायचं नाही का? मला काही कळत नाही. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तुस्थितीवर आधारित बातम्या देण्याची जबाबदारी माध्यमांवर आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on speculations about his unhappiness in ncp national conference pbs
First published on: 12-09-2022 at 13:41 IST