Ajit Pawar Criticise Pratibha Pawar : विधानसभेच्या निमित्ताने राज्यात काका-पुतण्या अशी लढत रंगली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात सख्खे काका-पुतणे (अजित पवार आणि युगेंद्र पवार) एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने या लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शक्य तितक्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. खुद्द शरद पवार निवडणुकीच्या प्रचारात उतरले असून प्रतिभा पवारांनीही घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. यावरून अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलंय. बोल भिडूने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“मला आईसमान असलेल्या आमच्या प्रतिभाकाकी गेल्या ४० वर्षांपासून घरोघरी जाऊन प्रचार करत नव्हत्या. परंतु, त्या आता घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. अजितला पाडण्याकरता जात आहेत का?” असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “आम्हा सर्व मुलांमध्ये मीच काकींच्या सर्वाधिक जवळ राहिलेलो आहे. त्यामुळे मी भेटल्यानंतर त्यांना याबाबत विचारणार आहे. सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीला, माझ्या निवडणुकीला त्या एवढ्या फिरल्या नाहीत. १९९० पर्यंत त्या शरद पवारांच्या प्रचारसभेला जायच्या. परंतु, त्यानंतर त्यांनी प्रचार केलेला नाही. फक्त निवडणुकीच्या शेवटच्या सभेला त्या यायच्या. बाकी कधी यायच्या नाहीत.”

हेही वाचा >> “मी जातीयवादी असल्याचा पुरावा द्या” म्हणणाऱ्या शरद पवारांना राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले, “जेव्हा पुण्यात…”

सुप्रिया सुळेंनी चारवेळा अर्ज भरला, पण शरद पवार कधीही आले नाहीत

“त्यादिवशीही मला आश्चर्य वाटलं. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर टीका टिप्पणी करत नाही. पण आतापर्यंत मी सातवेळा विधानसभेचा अर्ज भरला, एकवेळा लोकसभेचा अर्ज भरला. सुप्रिया सुळेंनी चारवेळा अर्ज भरला. पण शरद पवार कधीही उमेदवारी अर्ज भरायला आले नाहीत. परंतु, परवा मिरवणूक न काढता शरद पवार स्वतः युगेंद्र पवार यांचा अर्ज भरायला गेले. रोहितनेही तेव्हा फॉर्म भरला, पण पवार साहेब तिथे गेले नाहीत. हा दुजाभाव का? मनात शंका येते. कधी भेटलो की मी याबाबत विचारेन”, असंही अजित पवार म्हणाले.

ते वयाच्या ८५ वर्षी काम करत आहे अन् मला रिटायर व्हायला सांगत आहे

“शरद पवार आता म्हणतात की कोणत्याही निवडणुकीत उभा राहणार नाही. ते माझ्यापेक्षा २० वर्षांनी मोठे आहेत. ते ८५ वर्षांचे आहेत आणि ते मला आता रिटायर करायला निघालेत. ते मात्र ८५ पर्यंत काम करू शकतात, हा कोणता न्याय?” असाही प्रश्न अजित पवारांनी विचारला.

Story img Loader