Ajit Pawar Death Case Supriya Sule and Rohit Pawar Post: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनाला आज (२८ मार्च) दोन महिने पूर्ण होत आहेत. २८ जानेवारी रोजी अजित पवार मुंबई ते बारामती असा विमान प्रवास करत असताना त्यांचे विमान बारामती येथील धावपट्टीनजीक कोसळले होते. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणासह देशभरात खळबळ उडाली. अपघातानंतर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार हे घातपाताचा संशय व्यक्त करून आरोपांची राळ उडवून दिली. तर सुप्रिया सुळेंनीही लोकसभेत हा विषय उचलला.

अजित पवारांच्या निधनाला दोन महिने झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एका भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि आपणा सर्वांचे लाडके अजितदादा यांना आपल्यातून जाऊन दोन महिने झाले. दादा जणू अजूनही आपल्या अवतीभवती आहेत असंच वाटतं. व्हि मिस यू दादा.”

आमदार रोहित पवार यांनीही एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, “आठवणींचे दोन महिने… ये प्यार और संघर्ष आखिर तक चलता रहेगा…” रोहित पवार यांनी या कॅप्शनमध्ये जस्टीस फॉर अजितदादा असा हॅशटॅगही दिला आहे.

घातपास असेल तर त्यांचा मुडदाही खणून काढू

अजित पवारांचा घातपाताने मृत्यू झाला असल्याचा दावा रोहित पवार करत आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. ते म्हणाले, “कदाचित तुमच्या (रोहित पवार) तीव्रतेपक्षा माझी तीव्रता कमी असू शकते. पण इतकीही बोथट नाहीय की अजितदादांच्या केसमध्ये कोणीही षडयंत्र रचले असेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ. त्याचा मुडदाही खणून काढू आम्ही. पुन्हा सांगतो की तुम्ही जे प्रयत्न करताय त्याला माझं समर्थन आहे. तुम्ही तरुण आहात, इतरांची तीव्रता कमी आहे, असे तुम्ही समजू नका.”

कर्नाटकला FIR घेण्याचा अधिकार नाही

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “रोहित पवार यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांनी बहुतेक कर्नाटकात जाऊन एफआयआर नोंदविण्याचा सल्ला दिलेला असू शकतो. कर्नाटकला झिरो एफआयआर घेण्याचा अधिकारच नाही. हा बेकायदेशीर एफआयआर आहे. कारण पीडित जेव्हा एफआयआर दाखल करण्याच्या परिस्थितीत नसतो, त्यावेळीच झिरो एफआयआर करता येतो. अशाप्रकारे झिरो एफआयआर घेण्याचे न्यायक्षेत्र कर्नाटकला बिलकूल नाही.”

CM Devendra Fadnavis on Karnataka FIR
अजित पवार अपघात प्रकरणाचा FIR का घेतला नाही? मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट; कर्नाटकच्या FIR वर केली टीका

सुप्रिया सुळे लोकसभेत काय म्हणाल्या?

अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची कालमर्यादित चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

जर राज्याच्या दिवंगत उपमुख्यमंत्र्याला न्याय मिळत नसेल तर इतरांचे काय? असा प्रश्न लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खासदार सुळे यांनी केला. तसेच याप्रकरणी ‘एफआयआर’ दाखल न केल्याबद्दल राज्य सरकारवरही त्यांनी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही थोड्यावेळापूर्वी एक व्हिडीओ शेअर करत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.