Both NCP To Come Together: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाल्यानंतर फक्त राजकीयच नव्हे, तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे जसे उपमुख्यमंत्रीपदी आता कोण? अर्थसंकल्प कोण मांडणार? हे प्रश्न उपस्थित होत आहेत, तसाच दोन्ही राष्ट्रवादींचं आता एकत्र येणार का? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून मोठे दावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.

“अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद”

आपल्याला पुढे वाटचाल करायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींना एक व्हावंच लागेल, असं झिरवळ एबीपीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत. “पक्षपातळीवर अजून याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. आता आपल्याला तरायचं असेल, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी काल बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू होती”, असं झिरवळ म्हणाले.

“एकमेकांच्या समोर जाणं, एकमेकांना पाहात राहाणं, न बोलणं असा प्रकार आधी होत होता. अंत्यविधी झाल्यानंतर लोक बाहेर पडताना आता पुढे काय? अशी चर्चा होती. अनेकांचं मत आहे की सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या जागी आणलं पाहिजे. पवार कुटुंबं असेल तरच आपला टिकाव लागेल, असं सगळ्यांचं मत आहे”, असा मुद्दा झिरवळ यांनी उपस्थित केला.

बऱ्याच दिवसांपासून दोन्ही पवारांच्या बैठका

दरम्यान, अपघाताची दुर्दैवी घटना घडण्याच्या काही दिवस आधीपासून एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार शरद पवार यांच्या बैठका होत होत्या, असं झिरवळ म्हणाले आहेत. “शरद पवार व अजित पवारांच्या बऱ्याच दिवसांपासून बैठका चालू होत्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा मुद्दा अनेक दिवसांपासून दिसत होता. आता इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे”, असं ते म्हणाले.

“८ फेब्रुवारी नाही, पण लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आता राज्यभरातून नेते शरद पवारांना भेटतील तेव्हा सगळेजण आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या जातील. मीही शरद पवारांना भेटणार आहे. आम्ही त्यांना विनंती करू की आता कुणालाच कुणीच राहिलेलं नाही. शरद पवारांची प्रकृती, वय हे बघितलं तर एकत्र येण्यावाचून पर्याय नाही अशी आमची तयारी असेल”, असं नरहरी झिरवळ यांनी नमूद केलं.

एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही – नरहरी झिरवळ

दरम्यान, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचं झिरवळ म्हणाले. “राज्यात अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आहेत. पण देशपातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल राहतील. देश पातळीवर ज्यांनी काम केलं, त्यांनाच ती जबाबदारी दिली जाईल. छोटे-मोठे काही हेवेदावे असतील तर ते विसरून सगळे कुटुंबीय एक होतील. कारण त्याशिवाय कुणालाच पर्याय नाही. त्यांनाही नाही, आम्हालाही नाही”, असं नरहरी झिरवळ यांनी नमूद केलं.