२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. दरम्यान आज म्हणजेच ९ फेब्रुवारीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी तीन नावं घेत शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अजित पवारांच्या घड्याळातली वेळ १५ मिनिटं पुढे असायची

अजित पवार जे घड्याळ घालायचे त्यातली वेळ ही कायम १५ मिनिटं पुढे ठेवायचे. अजित पवारांचं जे घड्याळ जळालेल्या अवस्थेत सापडलं त्यात ९ वाजले होते. ते घड्याळ बंद पडलं होतं. ते पाहून मला समजलं की अजितदादा आपल्यात नाहीत. ज्यांनी विमानाची अवस्था पाहिली त्या सगळ्यांना अश्रू अनावर आले. अजितदादा आपल्यात नाहीत, ते नसले तरीही विचारांनी ते आपल्या बरोबर आहेत असं रोहीत पवार यांनी म्हटलं आहे.

२८ जानेवारीच्या त्या दिवशी काय घडलं? रोहित पवार काय म्हणाले?

अजितदादा हे ७ वाजून ५० मिनिटांनी एअरपोर्टवर आले. दादांचे विमान ८ वाजून १० मिनिटांनी टेक ऑफ केलं. ८.२२ ला ते विमान हे लोणावळा या ठिकाणी असेल. ८ वाजून ४३ मिनिटं ते ८ वाजून ४५ मिनिटं या दरम्यान ती दुर्दैवी घटना घडली. ९ वाजता दादा गंभीर असल्याची माहिती आली आणि सकाळी ९.४५ च्या दरम्यानदादांचं निधन झाल्याची बातमी आली.

रोहित पवारांनी कुणाची नावं घेतली आहेत?

रोहित पवार म्हणाले, ‘हा अपघात होता की घात होता? असा प्रश्न तुम्ही केला. सर्वांची शंका आहे की हा घात होता. आजच्या सादरीकरणावरून समजेल की मी प्रत्येक गोष्ट सांगितली. एक एक गोष्ट घडली. कशी घडली? कुणाचं विमान होतं? ही सर्व माहिती तुम्हाला दिली? कुणावर शंका घेतोय असं नाही. मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. याबाबत व्हिएसआर विमान कंपनी, अॅरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका आहे. या सर्व चर्चेत अॅरो नावाच्या कंपनीने व्हिएसआरचं विमान हायर केलं होतं. सरकारी जीआर नुसार घेतलं होतं. पवार नावाचा माणूस अॅरोचा हँडलर आहे. त्याने व्हिजिबिलीटी क्लिअर असल्याचं म्हटलं आहे. ही कंपनी बऱ्याच राज्यात काम करत आहे. या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे.’ असं म्हणत रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे.

सरकारवर आरोप नाही, कुणावरही आरोप नाही-रोहीत पवार

रोहित पवार म्हणाले की, डीजीसीवर विश्वास आहे. सरकारवर आरोप नाही. कुणावर आरोप नाही. अशा गोष्टी घडल्या असतील अशी शंका आहे. पोलिसांना एअरपोर्टवर परवानगी नसते. सीआयडी चौकशी करत नाही. त्यात एक्सपर्ट ओपिनियन हवं. त्यामुळे बाहेरच्या कंपन्या घ्या. तसेच ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग, संपूर्णपणे परिवारातील एका व्यक्तीला एक्सपर्ट बरोबर बघण्याची संधी द्यावी. ही सरकारला विनंती आहे. सीआयडीवर आक्षेप घेत नाही. कधी कधी एखाद्या एजन्सीचं नाव दिल्यावर लोकांना वाटतं लय भारी काम. पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करणार नाही. हे त्यांचं एक्सपर्टीज नाही. हृदयाचा आजार असेल तर हृदयाच्या डॉक्टरकडे जावं लागतं. डोळ्यांच्या नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.