अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. पवार कुटुंबासह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. २९ जानेवारीला अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांना अशा पद्धतीने निरोप द्यावा लागेल आणि असं कुणालाही वाटलेलं नव्हतं. दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी म्हणजेच ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपघाताच्या वेळी काय घडलं होतं त्याबाबत मोठा दावा केला आहे.
अमोल मिटकरी यांनी काय म्हटलं आहे?
अमोल मिटकरी अकोल्यात म्हणाले, “सरपंचांनी असं वक्तव्य केलं होतं की कुणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्यांना वाचावयला गेलो तर अचानक स्फोट झाले. नंतर कळलं पाच मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA कडून सांगितलं जातं आहे की विमानात सहा जण होते. असं असूनही पाच मृतदेहच सापडतात, जी कागदपत्रं आहेत ती कुठेही जळालेली नसतात. आता हा घात आहे की अपघात? ज्या कंपनीचं विमान होतं त्या कंपनीवर एक वर्षापासून बंद होती. मी आधीही म्हटलं तसं की अजित पवारांच्या घड्याळावरुन ओळख पटली असं सांगितलं गेलं. पण आता तोही मुद्दा खोडून काढण्यात आला आहे. घड्याळावरुन ओळख पटली नाही. त्यांच्या अंगावर असलेल्या पांढऱ्या कपड्यांवरुन ओळख पटली असंही सांगितलं गेलं.”
अजित पवार कारमध्ये सीटबेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हते मग अपघात कसा काय झाला?
अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “अजित पवार यांना जाऊन सहा दिवस झाले आहेत. त्यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे. मला शंका होती म्हणून मी तो मुद्दा महाराष्ट्राच्या पटलावर ठेवला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं गेलं पाहिजे अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. जर अजित पवारांचा मृत्यू घातपातात झाला असेल तर याचा बदला घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची आहे. बदला घ्यायचा म्हणजे ढाल-तलवारी काढून बदला नाही घ्यायचा. पण सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करायचे आहेत. जे अजित पवार कारमध्ये सीट बेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हते त्या अजित पवारांचा अपघात असा कसा काय झाला? हे शंकेचं काहूर प्रत्येकाच्या मनात आहे.”

