२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर हा अपघात होता की घातपात यावर प्रश्न उपस्थित झाले. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन ते चार वेळा विमान कंपनीने कसा ढिसाळपणा केला? याबाबत प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली त्यातही गंभीर प्रश्न उपस्थित केले. आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी माझीच नाही तर अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या
शरद पवार राज्यसभा लढत आहेत याचा सगळ्यांना आनंद
शरद पवार राज्यसभा लढत आहेत याचा आनंद सगळ्यांनाच आहे. मी उद्धव ठाकरेंचे आभार मानते. २००६ ला म्हणजे २० वर्षांपूर्वी मी राज्यसभेत गेले होते तेव्हा बाळासाहेबांनी मला पाठिंबा दिला होता. आता २० वर्षांनी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा आहे. सगळे पक्ष सुसंस्कृतपणे सामोरे जात आहेत. यशवंतराव चव्हाणांची जी संस्कृती होती ती दिसून येते आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. बारामतीकरांचेही मी आभार मानते कारण त्यांनी सहा दशकं शरद पवारांना साथ दिली. मी त्यांच्यापुढे नतमस्तक आहे, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.यानंतर त्यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत भाष्य केलं.
अजित पवारांच्या अपघाताबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राज्यसभेत जे बिनविरोध जात आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. रामदास आठवले, विनोद तावडे यांच्यासह आम्ही चांगलं काम केलं आहे. नागपूरच्या महिला आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला शब्द दिला होता. महाराष्ट्रात अजितदादावर प्रेम करणारे लोक आहेत ते अस्वस्थ आहेत. रोहित बोलतो आहे, जय बोलतो आहे. लोकांमध्ये कुठेतरी अस्वस्थता आहे, जे काही घडलंय त्याची पारदर्शक चौकशी व्हावी ही मागणी आहे. रोहित आणि जय ही माझ्या घरातली मुलं आहेत म्हणून मी हे म्हणत नाहीये. महाराष्ट्रातल्या असंख्य अजितदादा प्रेमींचीही हीच मागणी आहे की सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे समोर आल्या पाहिजेत.
बिहारबाबत काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?
बिहारच्या निवडणुका झाल्या तेव्हा नितीश कुमारच चेहरा होते, आता एकदम कसा काय बदल बिहारमध्ये झाला ? हे आता सोमवारी दिल्लीत जाऊन समजून घ्यावं लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
