राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवारांच्या या अकाली निधनामुळे यंदा राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री स्वतःच यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील अशी चर्चा सुरू होती. यादरम्यान आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबद्दल माहिती दिली आहे.
अर्थसंकल्प कोण सादर करणार असा थेट प्रश्न विचारण्यात आल्यानंतर फडणवीस म्हणाले की, ” आता तरी अजितदादांनी अर्थसंकल्पाची भरपूर तयारी केली होती. त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे. त्यानंतर आम्ही परिस्थितीनुसार काय करायचं हे ठरवू,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांच्या निधनानंतर उद्या (शनिवारी) सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदावर निवड केली जाणार आहे. तसेच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी देखील उद्याच पार पडण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठिशी आपण उभे राहू असे स्पष्ट केले आहे. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी कॉंग्रेस घेईल. त्यांचे जे काही निर्णय असतील, त्याला आमचे समर्थन राहील, असे फडणवीस म्हणाले आहेत.
अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच राहणार का?
महायुती सरकारमध्ये अर्थ हे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आणि अर्थमंत्रीपदाचा मोठा अनुभव असलेले आणि अर्थविषयक दांडगा अभ्यास असलेले अजित पवार यांनी हे खाते सांभाळले. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आघाडी सरकारच्या काळातही अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी ते अनेक वर्षे भूषविले होते. दरम्यान सध्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ मंत्री आहेत. अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवण्याचा निर्णय झाला, तर त्याचा कार्यभार त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना अर्थ खात्याची जबाबदारी ही त्यांच्याकडे होती. तसेच त्यांचा या खात्याचा अभ्यासही चांगला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस अर्थखाते स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे.

