Anil Deshmukh statement on ncp merger : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच त्यांचा शपथविधी देखील पार पडेल. एकीकडे या हलचालींना वेग आलेला असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा देखील सुरू आहे. यादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी यासंबंधी महत्त्वाचे विधान केले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत ही अजितदादा पवार यांची मनापासून इच्छा होती. त्यासाठी त्यांनी जयंत पाटील आणि आम्हा सर्वांबरोबर अनेक वेळा बैठका देखील केल्या होत्या. त्यांच्या पक्षात देखील याची चर्चा झाली आहे. अजित पवारांची इच्छा होती की लवकरात लवकर दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत. यासाठी निर्णय देखील झाला होता, फक्त घोषणा कधी करायची हेच तेवढे बाकी होते.”

“आधी हे ठरलं होतं की महानगरपालिका निवडणुकीनंतर २० जानेवारीपर्यंत याची घोषणा करून दोन्ही पक्ष एकत्र येतील. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्याने हा निर्णय थोडा पुढे गेला. आता १० फेब्रुवारी हे होणार होते, पण अचानक ही दुर्घटना झाली,” असेही अनिल देशमुख म्हणाले

आता शरद पवार, सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार, अजित पवारांचे बंधू हे एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आला तर आनंदाची गोष्ट आहे असेही अनिल देशमुख म्हणाले. विलिनीकरणाच्या निर्णयाबद्दल बोलताना देशमुख म्हणाले की, अजित पवार असते तर याचा निर्णय १० फेब्रुवारीपर्यंत होणार होता. त्यासाठी बैठका सुरू होत्या.

उद्याच शपथविधी होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी उद्या (शनिवारी) पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात लगेचच समावेश करण्यात येणार आहे. हा शपथविधीचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पाडला जाईल.