Supriya Sule Expresses Deep Grief in a New Social Media Post : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आज त्यांना जाऊन एक महिना झाला तरीही त्यांच्या जाण्याचं दूःख सामान्य नागरिकांच्या मनातून गेलेलं नाही. दरम्यान, आज खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासाठी पोस्ट केला आहे.

“आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, अजित पवारांचं निधन झालं तेव्हा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरता दिल्लीत होत्या. त्यांच्या कानावर ही बातमी पडताच त्या दोघीही लागलीच बारामतीच्या दिशेने आल्या. या प्रचंड वेदनेच्या काळात सुप्रिया सुळेंनी सातत्याने सुनेत्रा पवारांना आधार दिल्याचे व्हिडिओ समोर आले. तसंच, अंत्यविधीच्या संपूर्ण नियोजनताही सुप्रिया सुळेंनी जातीने लक्ष घातलं होतं. तसंच, सुप्रिया सुळेंनी उद्ध्वस्त असं व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवून अजित पवारांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला होता. तर अजूनही विश्वास बसत नाहीय, असंही स्टेटस त्यांनी ठेवलं होतं.

घातपाताच्या संशयावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघातात घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. याबाबत रोहित पवारांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता वाटते का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जोपर्यंत चौकशी सुरू आहे, तोपर्यंत कोणतेही अंदाज बांधणे योग्य नाही. हे संवेदनशील प्रकरण आहे. जो व्यक्ती मृत्यू पावला त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचाही आपल्याला विचार करावा लागतो. या विषयावर पतंगबाजी करणे किंवा हवेत गोळ्या मारण्याचा प्रकार मी करणार नाही.”