Ajit Pawar Death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीच्या सकाळी अपघाती निधन झालं. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अजित पवार यांच्या पार्थिवावर २९ जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालं आहे. दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूनंतर विविध नेते विविध प्रकारच्या चर्चा करत आहेत. त्याबाबत रोहित पवारांनी पोस्ट लिहिली आहे. अजित पवारांच्या आत्म्याला क्लेश होईल असं कुणी काही बोलू नका अशी हात जोडून विनंती करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांची पोस्ट नेमकी काय?
माननीय अजितदादा गेल्यापासून अनेकजण राजकीय चर्चा करताना दिसतायत, पण आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा अजितदादांच्या जाण्याच्या दुःखाची व्याप्ती कितीतरी पट मोठी आहे. अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळं असतं आणि दादांशिवाय कुणीही त्यावर चर्चाही केली नसती, पण आज दादाच आपल्यात नाहीत. त्यांचं जाणं हे आपल्या सर्वांवरच आभाळ कोसळल्यासारखं आहे आणि अशा वातावरणात कुणीही राजकीय चर्चा करणं योग्य वाटत नाही. त्यामुळं पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोहचेल आणि त्यांच्या स्पष्ट व परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तूर्तास तरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे…!
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर काय चर्चा सुरु झाल्या आहेत?
खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे. भाजपाचं नाव घेत त्यांनी १५ जानेवारीच्या अजित पवारांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. तसंच अवघ्या १२ ते १४ दिवसांमध्ये अजित पवारांचा मृत्यू कसा झाला हे विचारलं आहे. राज्यसभेतही त्यांनी लोया प्रकरणाची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे असं म्हणत दाल में कुछ काला है असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही काही प्रश्न विचारले आहेत. तसंच छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या शोकसभेत विमान पलटी कसं काय झालं? काहीतरी गडबड आहे म्हणत शंका उपस्थित केली आहे. या सगळ्या चर्चांनंतर आता रोहित पवार यांनी पोस्ट करत अजित पवारांच्या आत्म्याला क्लेश होईल असं कुणी बोलू नका असं म्हणत विनंती केली आहे.

