राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला. दरम्यान रोहित पवार यांनी दोनदा पत्रकार परिषद घेऊन VSR कंपनी आणि डीजीसीएवर गंभीर आरोप केले. त्यानंतर डीजीसीएने VSR कंपनीवर कारवाईही केली. दरम्यान संजय राऊत यांनी अजित पवारांचा अपघात हा सदोष मनुष्यवधच आहे असं म्हटलं आहे. तसंच सरकारने योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणीही केली आहे.
संजय राऊत यांनी अजितदादांच्या अपघाताबाबत काय म्हटलंय?
आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे नेते लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणतं आहे आम्ही सदोष मनु्ष्यवध म्हणतो आहे. मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, अमित शाह यांचा आक्रोश त्या दिवशी पाहायला मिळाला तो खरा की खोटा हा प्रश्न आम्हाला पडला आहे. रोहित पवार यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन VSR कंपनी आणि डीजीसीए यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी करणारी तक्रार दाखल केली. मात्र रोहित पवारांची मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसाठी त्यांचा नातेवाईक पोलीस ठाण्यात येतो आणि तक्रार करतो आणि तक्रार घेतली जात नाही. मरिन ड्राईव्हचे डीसीपी होते त्यांना एक फोन आला. त्या दबावातून तक्रार घेतली गेली नाही. याचा अर्थ तुमचे अश्रू मगरीचे होते. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे
एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये झाला त्याला पायलटला जबाबदार धरलं जातं आहे. पण पायलट दोषी नव्हता. अजित पवारांच्या अपघाताचं प्रकरण दाबलं जातं आहे. VSR कंपनीत अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतले आहेत. रामा नायडू हे चंद्राबाबू नायडूंच्या पक्षातले आहेत. चंद्राबाबू नायडू आणि या कंपनीची आर्थिक देवाणघेवाण आहे. अशावेळेला काय तपास करणार? रोहित पवार ज्या पद्धतीने मुद्दे मांडत आहेत त्यांचं स्पष्टीकरण, उत्तरं आली पाहिजेत. आमचीही हीच भावना आहे. मुंबईत तक्रार दाखल करणं आवश्यक होतं. आज रोहित पवार बारामतीत आहेत. तक्रार दाखल करणार आहेत. विधीमंडळातही हा विषय समोर आला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
अजितदादांचा अपघात नाही, सदोष मनुष्यवधच-राऊत
रोहित पवार पोलीस ठाण्यात असताना उपायुक्तांना एक फोन आला. ते येस सर येस सर करत बाहेर गेले आणि मग त्यांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. आज रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामतीमध्ये जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. DGCA हे या सरकारमधलं सर्वात भ्रष्ट खातं आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सदोष मनुष्यवध केले आहेत आणि त्यांच्या केसालाही कुणी धक्का लावू शकलेलं नही. कारण खासगी विमान कंपन्यांना डीजीसीएचा आशीर्वाद असणं आवश्यक असतं. अनेक राजकारण्यांचे VSR ला आशीर्वाद आहे. मी कागदपत्रांसह काही गोष्टी पाहिल्या आहेत. त्यामुळे डीजीसीए आणि व्हिएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजितदादांचा मृत्यू हा सदोष मनुष्यवध आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अजित पवार भाजपाची साथ सोडणार होते, संजय राऊत यांचा दावा
माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार हे दोन पक्षांच्या विलीनीकरणानंतर भाजपाची साथ सोडणार होते. भाजपाच्या पकडीतून आणि तावडीतून बाहेर पडायचं होतं असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

