Ajit Pawar Passes Away : महाराष्ट्राचे लाडके लोकनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी म्हणजेच २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यासह आणखी पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. कॅप्टन सुमित कपूर हे या विमानाचे वैमानिक होते. बारामतीच्या विमानतळावर उतरण्याआधीच क्रॅश लँडिंग झालं आणि अजित पवारांसह कॅप्टन सुमित कपूर आणि इतर सर्वांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. दरम्यान या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर हे असणार नव्हते, त्यांना अचानक अजित पवारांना विमानाने बारामतीला घेऊन जा असा आदेश कंपनीने दिला, अशी माहिती आता समोर आली आहे.

कॅप्टन सुमित कपूर यांच्या मित्रांनी काय माहिती दिली?

कॅप्टन सुमित कपूर यांच्या मित्रांनी सांगितल्यानुसार अजित पवारांना घेऊन जे विमान बारामतीला जाणार होतं त्या विमानाचं उड्डाण करण्याची जबाबदारी कंपनीने दुसऱ्या एका वैमानिकावर सोपवली होती. सुमित कपूर हे ते विमान चालवणार नव्हते. मात्र अजित पवारांना बारामतीला घेऊन जाण्याची जबाबदारी ज्या वैमानिकावर होती तो वेळेवर पोहचू शकला नाही. वाहतूक कोंडीत तो अडकला त्यामुळे सुमित कपूर यांना तुम्ही अजित पवारांना घेऊन बारामतीला जा हे सांगण्यात आलं आणि अशा रितीने सुमित कपूर हे त्या विमानाचे वैमानिक म्हणून आले अशी माहिती सुमित कपूर यांच्या मित्रांनी दिली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

Ajit Pawar Funeral Updates
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामतीसह महाराष्ट्र या घटनेने हळहळला.

सुमित कपूर यांना अचानकच जबाबदारी देण्यात आली

सुमित कपूर यांना अजित पवारांना बारामतीला विमानाने घेऊन जा असा आदेश कंपनीने दिला. ज्यानंतर सुमित कपूर यांनी विमान घेऊन उड्डाण केलं. पण पुढे जी दुर्घटना घडली त्या अपघातात अजित पवारांसह, सुमित कपूर आणि इतर सगळ्यांचाच मृत्यू झाला असं सुमित कपूर यांच्या मित्राने सांगितलं. सुमित कपूर यांचा स्वभाव मनमिळाऊ होता आणि ते कुटुंब वत्सल होते. काही दिवसांपूर्वीच ते हाँगकाँगहून परतले होते. सुमित कपूर यांच्याकडे १६ हजार ५०० तासांहून अधिक काळ विमान उड्डाणाचा अनुभव होता. तसंच आत्तापर्यंत सुमित कपूर यांनी अनेक हाय प्रोफाइल व्यक्तींचं फ्लाईट ऑपरेट केलं होतं. सुमित कपूर यांचे मित्र सचिन तनेजा यांनी सांगितलं की विमानाचं चालवणं हे सुमित कपूर यांच्यासाठी पॅशन होतं. आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही की सुमित आपल्यात नाहीत. त्यांच्या हातात असलेलं जे कडं होतं त्यावरुन त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली अशी माहिती जीएस. ग्रोव्हर या त्यांच्या मित्राने दिली.