Ajit Pawar Passes Away : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. अजित पवार प्रचारासाठी आणि सभांसाठी बारामती या ठिकाणी चालले होते. त्यावेळी अजित पवारांचं विमान हे धावपट्टीवर उतरत असताना त्याचा स्फोट झाला आणि अजित पवार नावाचा लोकनेता या अपघातात काळाच्या पडद्याआड गेला. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला?
१) सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीकडे उड्डाण झालं. त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा समावेश होता.
२) सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी अजित पवारांचं विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं, त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला.
३) सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजित पवारांसह सर्व जणांचा मृत्यू झाला.

अजित पवारांच्या विमानात त्यांच्यासह कोण होतं?
अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

विमान अपघाताचा घटनाक्रम
१) पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
२) बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाही.
३) त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
४)विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द केला गेला.
५) धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
६) याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला. DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
७) लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले. सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.
८) रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
विमान जमीनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले, ज्यात सगळ्यांचा मृत्यू झाला.

बारामतीवर शोककळा
बारामती येथील रुग्णालयाच्या बाहेर हजारो लोक जमले आहेत. अजित पवार परत या अशी घोषणा देत आहेत. धडाडीचे नेते, कार्यक्षम नेते अशी अजित पवार यांची ओळख होती. प्रशासनावरती जबरदस्त पकड असलेला माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. आज सकाळी बारामतीत येत असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि याच अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. आमचा जबाबदार माणूस गेला, आमचं अस्तित्व आता संपलं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे जी ते बोलून दाखवत आहेत.

अजित पवार दिलखुलास नेते म्हणून प्रसिद्ध
महाराष्ट्राच्या राजकारणातले दिलखुलास नेते म्हणून अजित पवार प्रसिद्ध होते. लोकांना आपलंसं करुन घेण्याची शैली त्यांच्या भाषणात होती. तसंच अजित पवार हे रोखठोक असले तरीही तेवढेच प्रेमळ आणि लोकांबाबत आपुलकी असणारे नेते म्हणून प्रसिद्ध होते. लोकनेते अशीच त्यांची ओळख निर्माण झाली. आज याच अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतली आहे.
