Ajit Pawar Passes Away : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबईतून बारामातीला जाणाऱ्या त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमानातील सर्वजणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की विमान खाली कोसळताच भीषण स्फोट झाला. ही संपूर्ण घटना प्रत्यक्षदर्शींनी पाहिली आहे. त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
“विमान आकाशात घिरट्या घालत होतं. साधारण १०० फूट आधी ते विमान कोसळलं आणि विमानाने पेट घेतला. आम्ही त्या दिशेने धावलो पण तोपर्यंत विमानाचा चक्काचूर झाला होता. पहिल्यांदा विमान जेव्हा वरून गेलं तेव्हा फिरून आलं, मग ते आणखी खाली आलं, त्यानंतर ते आणखी खाली आलं आणि धावपट्टीला चिकटलं. त्यानंतर अचानक मोठा आवाजा होऊन स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर लगेच तुकडे उडाले आणि विमान तुलटलेल्या अवस्थेत फिरलं”, असं एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं.
आग अर्धातास धुमसत होती
“एवढा मोठा स्फोट झाला की कोणीच काहीच करू शकत नव्हतं. मग अग्निशमन दल आले, त्यांनी पाणी मारून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. विमान खाली आल्यावर स्फोट झाला. इतका मोठा स्फोट झाला की आम्ही खूप घाबरलो होतो. पोलिसांनी आम्हाला पाणी आणायला लावलं. आम्ही बादलीने पाणी आणलं. अजित पवारांचा मृतदेह साईडला उडून पडला होता. आम्ही ते प्रत्यक्षात पाहिलं. आम्ही नवीन ब्लँकेट दिलं. त्यात त्यांना गुंडाळून ठेवलं. आग जवळपास अर्धातास धुमसत होती, असं एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं.
गॉगल आणि घड्याळावरून आम्ही अजितदादांना ओळखलं
तसंच, आम्ही गॉगल आणि घड्याळावरून ओळखलं की हे अजितदादा आहेत. त्यामुळे सुरुवातीला आम्ही दादांची बॉडी काढली, असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
विमान अपघातात पाचही जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी मुंबईहून ते निघाले. बारामतीमध्ये विमान लँड होताच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे विमान अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार याच्यासह पाचजण होते. या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.
खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर प्रवाशांचाही मृत्यू ढाला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बारामतीला रवाना झाले आहेत.
