महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. लोकसभेतही अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. अजित पवार यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं होतं. ती इच्छा त्यांनी बोलूनही दाखवली होती. मात्र त्यांचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं. दरम्यान लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी या घटनेबाबत दृष्टिकोन या विशेष कार्यक्रमात त्यांचं मत मांडलं आहे.
काय म्हणाले गिरीश कुबेर?
महाराष्ट्रातला एक अत्यंत समर्थ नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. महाराष्ट्राच्या बाबतीत हे का घडतं? ते कळत नाही. प्रमोद महाजन बघता बघता असेच नाहीसे झाले. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख आणि आता अजितदादा. ज्या वयात नेतृत्व फुलत असतं आणि फुलू लागलं आहे असं दिसत असतं त्याच कालावधीत हे नेते काळाच्या पडद्याआड गेले हा खूपच मोठा आघात आहे. अजित पवारांना अनेक चेहरे होते. पवार या आडनावाविषयीच पूर्वग्रह बाळगून व्यक्त होत असतो. त्यांच्यासाठी अजित पवार हे छोटे खलनायक ठरले. त्या वर्गाला भाजपासह अजित पवारांनी येणं मान्य नव्हतं. दुसरा चेहरा आहे तो कर्तव्य कठोर प्रशासकाचा. समोर एखादा अधिकारी त्यांना काही सांगायला आला आहे तो विषयाच्या मांडणीची सुरुवात करतो त्याच्या आत अजित पवार आधीच सगळा विचार करुन बोलतात. तसंच गिरीश कुबेर यांनी अजित पवारांची आठवण काढत त्यांच्या रोखठोकपणाचे किस्सेही सांगितले आहेत. ते पाहण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.
उपमुख्यमंत्री अनेकदा मुख्यमंत्रिपद आपल्याला कसं मिळेल हे बघत असतो. पण अजित पवारांच्या बाबतीत हा मुद्दा आवर्जून नमूद करायला हवा, ज्या ज्या मुख्यमंत्र्यांसह त्यांनी काम केलं त्यांना त्यांनी १०० टक्के देणं लागतं ते दिलं. कुठल्याही मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणलं नाही. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा पृथ्वीराज चव्हाण असोत कुणाही विरोधात कागाळ्या त्यांनी केल्या नाहीत. अलिकडच्या काळातलं त्यांचं राजकारण त्यांच्यातल्या चांगल्या गुणांवर मात करणारं होतं. कारणं काहीही असू देत. केंद्रीय यंत्रणांचा दबाव असेल किंवा इतर कारणं असतील पण अजित पवारांना सत्तेत राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे. सत्ता स्वीकारणं त्यांच्यासाठी अनिवार्य आणि अपरिहार्य होतं. आता जो पक्ष काकांच्या नावाने जो पक्ष आपलाच आहे त्याचं काय होईल हा प्रश्नही उपस्थित होतो आहे. कारण अजित पवार या एका नावावरच या पक्षाची इमारत उभी होती असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.
