Ajit Pawar Driver Shyamrao Manve Recalls 28 January Incident: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन अद्यापही अनेकांच्या मनाला पटलेलं नाही. अजित पवारांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनाचा धक्का पवार कुटुंबिय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जसा बसला, तसा तो राज्यालाही बसला आहे. अजित पवार यांचे विमान २८ जानेवारी रोजी बारामतीमधील विमानतळाजवळ अपघातग्रस्त होऊन त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार मुळात २८ जानेवारी रोजी विमानाने नाही तर आदल्या रात्री गाडीने बारामतीला जाणार होते, अशी माहिती आता समोर आली असून २७ वर्ष अजित पवारांचे चालक म्हणून काम करणाऱ्या शामराव मनवे यांनी ही माहिती दिली आहे.
शामराव मनवे हे २७ वर्षांपासून अजित पवारांचे चालक आहेत. नेहमी सफारीवर असलेले मनवे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि माध्यमांना चांगलेच परिचित आहेत. नेहमी हसतमुख असलेले मनवे अजित पवारांच्या निधनाचे वृत्त कळल्यापासून धक्क्यात आहेत. नुकतेच त्यांनी बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना २७ जानेवारीची रात्र आणि २८ जानेवारी रोजी सकाळी काय काय घडले? याची माहिती दिली.
“अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्याप्रमाणे आमचीही न भरून येणारी हानी झाली. अजित पवार असे अचानक निघून जातील, हे कुणालाही वाटले नव्हते. २८ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता माझी आणि त्यांची भेट झाली होती. ते मला म्हणाले, तू गाडी घेऊन पुण्याला ये. मी तिथे भेटेल. पण त्यानंतर ४५ मिनिटांनी त्यांची बातमी आली, तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही”, असे शामराव मनवे म्हणाले.
आदल्या दिवशी गाडी तयार होती, पण…
शामराव मनवे पुढे म्हणाले, “आदल्या रात्री आम्ही निघणार होतो. मी गाडीही तयार ठेवली होती. त्या रात्री मुक्कामाला पुण्यात राहून निघायचे होते. पण २७ जानेवारी रोजी बैठका वाढत गेल्या. त्यामुळे अजित पवारांनी सकाळी निघण्याचा निर्णय घेतला. मला त्यांनी पुण्याला यायला सांगून ते विमान पकडून गेले. जर अजित पवार रस्ते मार्गाने आदल्या दिवशीच निघाले असते, तर हा अपघात घडलाच नसता.”
शामराव मनवे यांनी यावेळी अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचेही पैलू उलगडून सांगितले. ते म्हणाले, “अजित पवार कडक आहेत, असा लोकांचा गैरसमज होता. वास्तविक ते शिस्तीचे भोक्ते होते. त्यांचा स्वभाव फटकळ नव्हता. त्यांनी नेहमीच आम्हा सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेतली. स्वतःचा घासही ते आम्हाला भरवायचे. हा त्यांचा मोठेपणा आहे. मी २०१३ साली शासनाच्या नोकरीतून निवृत्त झालो. तरीही त्यांनी मला खासगी चालक म्हणून कायम ठेवले होते.”

