scorecardresearch

शिंदे गटाच्या बंडाचा सुगावा अजित पवार यांना कसा लागला? स्वतः अजित पवार यांनीच सांगितला २० जून २०२२ रोजीचा घटनाक्रम

शिंदे गटाचे बंड कसे झाले? त्याचा सुगावा कसा लागला? हे सरकार कोसळणार हे अजित पवार यांना कसे कळले? सर्व घटनाक्रमावर अजित पवार यांनी तपशीलवार माहिती दिली.

Ajit Pawar on Eknath Shinde
अजित पवार यांनी उलगडला २० जून २०२२ चा घटनाक्रम

महाराष्ट्राच्या राजकारणात काही घटना आणि त्यांच्या तारखा या कधीही विसरता येणार नाहीत. २३ नोव्हेंबर २०१९ रोजीचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी असेल किंवा २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले बंड असेल. या दोन्ही दिवशी जे काही राजकारण झाले ते अजूनही पूर्णपणे राज्याच्या समोर आलेले नाही. मात्र आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २० जून रोजीचा घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी याची माहिती दिली. तसेच शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस आहे, याची कल्पना त्यांनी शिवसेना पक्षाला आधीच दिली होती, असा दावा देखील या मुलाखतीमध्ये केला आहे.

२० जून २०२२ चा दिवस असा होता

अजित पवार म्हणाले की, तेव्हा मी राज्याचा उपमुख्यमंत्री असतो. त्यामुळे सरकार टीकवण्यासाठी सर्व गोष्टींवर मी लक्ष ठेवून असतो. सरकारला काही अडचण होणार नाही याची काळजी घ्यावीच लागते. शिवसेनेत नाराजी असल्याची कुणकुण माझ्या कानावर आली होती, त्यामुळे तशी कल्पना शिवसेनेला दिली होती. २० जून रोजीचा दिवस विधानपरिषदेच्या मतदानाचा होता. मी माझ्या उपमुख्यमंत्री कार्यालयात बसलो होतो. तिथे अब्दुल सत्तार आणि काही सहकारी आले. त्यांच्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या. जयंत पाटील आणि आमचे इतर सहकारी देखील उपस्थित होते. अब्दुल सत्तार निघून गेल्यानंतर मला काही आमदार म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांचा एक ग्रुप लॉबिमध्ये फिरत आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या दालनात बसलेले होते. ते स्वतः एक एक आमदाराला बोलावून त्यांच्याशी चर्चा करत होते.

हे वाचा >> अजित पवारांनी एका वाक्यात वरळीच्या सभेची उडवली खिल्ली, म्हणाले, “वरळीमध्ये जंगी, भव्य…”

एक एक आमदार कमी होऊ लागला

हे सर्व सुरु असताना त्या ग्रुपमधील एक एक आमदार कमी होत गेला. ठाण्याला निघायचं म्हणून आमदार गाडीत बसून जायला लागले. एकनाथ शिंदे त्यावेळी गटनेते होते. आमदारांचा एक ग्रुप गेलेला तेव्हा इतरांनीही पाहिला होता. हे बंड झाल्यानंतर सर्वांच्या लक्षात आलं की ते एकत्र का जात होते. तसेच एकनाथ शिंदे यांनीच ठाणे जिल्ह्यातील बहुतेक अधिकारी नेमले होते. त्यामुळे त्यांनीच नेमलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाड्या ठाणे जिल्ह्यातून बाहेर काढण्यास मदत केली. हे असं तेव्हा झालं, अशी तपशीलवार माहिती अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये दिली.

आता सरकार कोसळणार…

सरकार आता कोसळणार याची कल्पना केव्हा आली? असा प्रश्न अजित पवारांना यावेळी विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार म्हणाले, पहिल्यांदा १४-१५ आमदार गेले त्यावेळेस वाटत होतं सरकार पडणार म्हणून. कारण त्यांचे बाकीचे २५ एक सहकारी इथे थांबले होते. त्यांचे वर्षावर येणं-जाणं सुरु होतं. पण त्यातलेही काहीजण हळूहळू कमी व्हायला लागले. भाजपामधील काही नेते पडद्याआड सर्व गोष्टी करत होते. पण ते म्हणत होते, आमचा काही संबंध नाही. त्यांच्यातच फूट पडली वैगरे. पण कदाचित स्वतःचा चेहरा उघड होऊ नये किंवा ही फूट आपणच पाडली हे राज्यातील जनतेला वाटू नये म्हणून त्यांनी वेगळ्यापद्धतीने काही लोकांना पाठवलं असेल किंवा सांगितलं असेल.

हे वाचा >> “या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केला”, पत्रकाराच्या हत्येनंतर जयंत पाटील यांची सरकारवर सडकून टीका

हॉटेल, विमान कशी काय राखीव ठेवली

आमदारांच्या प्रवासासाठी विमानं ठेवली होती. जर तुम्ही विमानं ठेवू शकता. याचा अर्थ कुठलीतरी मोठी ताकद असल्याशिवाय विशेष विमानं ठेवू शकत नाही. तसेच दुसऱ्या राज्यात एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर एवढी यंत्रणा त्या राज्य सरकारच्यावतीने राबविली जाते की तिथे माध्यमांचा एकही माणूस जवळपास फिरकू शकत नाही. तसेच दुसराही व्यक्ती जाऊ शकत नाही, तेव्हाच माहीत झालं होतं की याच्यापाठी बोलवता धनी कोण आहे?

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 22:11 IST