scorecardresearch

“स्व. बाळासाहेब ठाकरेंना हिंदू धार्जिणे म्हणणे अर्धसत्य…”, अजित पवारांनी हिंदूहृदयसम्राट शब्दावर केले महत्त्वाचे भाष्य

विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्राचे अनावरण करत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्याबद्दलचे विचार प्रकट केले.

“स्व. बाळासाहेब ठाकरेंना हिंदू धार्जिणे म्हणणे अर्धसत्य…”, अजित पवारांनी हिंदूहृदयसम्राट शब्दावर केले महत्त्वाचे भाष्य
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहातील बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात सरकारच्यावतीने अनेकांची भाषणे झाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे देखील यावेळी भाषण झाले. ते म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचा दावा करत असताना जे पोटात, तेच ओठात, बोलणं एक आणि करणं एक, असे न करता बाळासाहेबांचे हे गुण आत्मसात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहीजे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. तसेच या तैलचित्रावर असलेल्या हिंदूहृदयसम्राट या उल्लेखावर आक्षेप घेत तिथे शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृसम्राट असा उल्लेख असावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

हे वाचा >> “मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार”, राज ठाकरे म्हणाले, “तैलचित्राच्या अनावरणाला उपस्थित नसलेले अनेकजण…”

पण बाळासाहेब हिंदू धार्जिणे नव्हते

अजित पवार पुढे म्हणाले, “स्व. बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदयसम्राट आहेतच, त्याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही. पण ते हिंदू धार्जिणे होते, हे अर्धसत्य आहे. बाळासाहेबांना हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन अशा सर्व धर्मीयांबद्दल आस्था आणि आदर होता. १९७२-७३ मध्ये शिवसेनेने रा.सु. गवई यांच्याबरोबर युती केली होती. मुंबई महानगरपालिकेत जागा कमी पडल्या असता मुस्लीम लीगचाही पाठिंबा घेतला होता. सुधीर जोशींना महापौर केले होते. भीमशक्ती-शिवशक्तीला एकत्र आणण्याचे काम बाळासाहेबांनी केले होते. आणीबाणीच्या काळात शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता.”

तैलचित्रावर फक्त हिंदूहृदयसम्राट शब्द नको

यावेळी अजित पवार यांनी तैलचित्रावरील हिंदूहृदयसम्राट या शब्दावरही आक्षेप घेतला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची खरी ओळख ही शिवसेना पक्षप्रमुख अशी होती. त्यामुळे तैलचित्रावर “शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे” असा उल्लेख करावा, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. स्व. बाळासाहेबांची जयंती अशी भव्य दिव्य स्वरुपात साजरी करण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. देशाच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या बाळासाहेबांचे तैलचित्र इथे लागत आहे ही महाराष्ट्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

हे वाचा >> “…तर राऊतांना बाळासाहेबांनी पायाखाली तुडवलं असतं”, संजय गायकवाडांची संतप्त टीका!

बाळासाहेब ठाकरे हे चक्रवर्ती सम्राट होते

अजित पवार पुढे म्हणाले, “बाळासाहेब तसे पाहिले तर राजकारणी नव्हते. त्यांचे जीवन खुल्या पुस्तकासारखे आहे. जे पोटात, तेच ओठात अशाप्रकारे त्यांचे वागणे होते. त्यात कोणतीही मोडतोड करता कामा नये. स्व. बाळासाहेब हिंदूहृदयसम्राट होते त्यासोबतच ते मैत्रीसम्राट, नेतृत्वसम्राट, कलासम्राट, चक्रवर्ती सम्राट होते. व्यवहारापलीकडे जाऊन त्यांनी मैत्री केली. राजकीय फायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मैत्री जपली. बाळासाहेबांनी जे काम केले ते जसेच्या तसेच पुढच्या पिढीसमोर ठेवले पाहीजे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 19:49 IST

संबंधित बातम्या