Ajit Pawar Old Post Viral: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर अजित पवार यांचे अनेक व्हिडिओ, ट्विट शेअर करत लोक त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्या एका जुन्या ट्विटची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ही पोस्ट जानेवारी २०२४ मधील असून, ती सध्या काही वापरकर्त्यांकडून शेअर केली जात आहे.

२०२४ मधील ट्विट काय होते? (Old Tweet From 2024)

१८ जानेवारी २०२४ रोजी अजित पवार यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर विमान प्रवासादरम्यानच्या अनुभवावर आधारित एक पोस्ट केली होती. त्या ट्विटमध्ये त्यांनी महिला वैमानिकांच्या कौशल्याबाबत सकारात्मक निरीक्षण नोंदवले होते आणि #NCPWomanPower असा उल्लेख केला होता. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे की, जेव्हा हेलीकॉप्टर किंवा विमान प्रवास करतो तेव्हा जर विमान किंवा हेलीकॉप्टर सुखरूप लँडिंग करते तेव्हा लक्षात येते की, वैमानिक एक महिला आहे. #NCPWomanPower”. या पोस्टचा उद्देश महिला वैमानिकांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करण्याचा होता.

अपघातानंतर पोस्ट का चर्चेत आली? (Why the Tweet Resurfaced)

बारामती येथील विमान अपघातानंतर ही जुनी पोस्ट काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पुन्हा शेअर केली. मात्र, या ट्विटचा सद्य अपघाताशी कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही, हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. ही पोस्ट त्या काळातील स्वतंत्र अनुभवा संदर्भात लिहिलेली होती आणि तिचा अपघाताच्या कारणांशी किंवा परिस्थितीशी संबंध जोडता येत नाही.

अपघाताबाबत अधिकृत माहिती (Official Status of Investigation)

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन वैमानिकांची टीम होती. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून अपघाताची चौकशी सुरू असून, हवामान परिस्थिती, तांत्रिक बाबी आणि ऑपरेशनल घटकांचा अभ्यास केला जात आहे आणि अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अजित पवार यांच्या निधनाने राज्यातील राजकीय आणि सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.सध्या, बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर दिवंगत नेत्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे.