scorecardresearch

मुख्यमंत्री-शरद पवार भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आज पहिल्यांदाच….”

शरद पवार यांनी ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar First Reaction On CM Uddhav Thackeray Sharad Pawar Meeting gst 97
अजित पवार यांनी मुख्यमंत्री-शरद पवार भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. (Photo : File)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आज (९ सप्टेंबर) झालेल्या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. आपल्या काही समस्या मांडत असतात. त्यांच्या ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल. म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार पुढे म्हणाले की, “शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर देखील अनेकदा पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. आज देखील लोकांच्या काही समस्यांवर निर्णय घेण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत. शरद पवार ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत आहेत. त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. राज्याच्या प्रश्नाकरिता चारवेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे.”

बैठकीला मला बोलावलं नाही, म्हणजे…!

“या बैठकीला मला, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांना बोलावण्यात आलं नाही याचा अर्थ ही चर्चा राजकीय नसावी. पक्षीय चर्चा असती तर कदाचित आम्हाला बोलावलं असतं”,असंही स्पष्टीकरण देखील यावेळी अजित पवार यांनी दिलं आहे.

राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बैठक

मुंबईत काल (८ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. राज्यातील आगामी निवडणुका, त्यासाठीची रणनिती, ओबीसींचं राजकीय आरक्षण या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. तसेच बैठकीत काही आजी माजी आमदारांनी आपल्या तक्रारी देखील मांडल्याची माहिती मिळते. सत्तेत असलेले शिवसेना आणि काँग्रेस मतदारसंघातील काम करत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी शरद पवार यांच्याकडे केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar first reaction on cm uddhav thackeray sharad pawar meeting gst