Maharashtra Deputy CM and NCP Leader Ajit Pawar Last Rites Updates : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात बुधवारी मृत्यू झाला. या बातमीमुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीला विमानाने येत होते. त्यावेळी धावपट्टीवर विमान उतरण्यापूर्वी क्रॅश लँडिंग झालं. विमानाचा स्फोट झाला आणि अजित पवारांसह विमानातले पाचही जण ठार झाले. अजित पवारांचं पार्थिव बुधवारी आणि गुरुवारी विद्या प्रतिष्ठान बारामती या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अलोट जनसागर जमला होता. यानंतर आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट लिहिली आहे. जी चर्चेत आली आहे.
रोहित पवारांची पोस्ट नेमकी काय?
महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी आज बारामतीत राज्य आणि देशभरातून आलेले अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य माणसं यांचं ऋण पवार कुटुंब कदापि विसरणार नाही..!
भावपूर्ण श्रद्धांजली ! अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.
अजित पवार यांना निरोप देताना सगळ्यांचेच डोळे पाणावले
‘एकच वादा, अजित दादा,’ ‘अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे,’ ‘परत या, परत या, अजित दादा परत या…’ दादा, दादा… असा हंबरडा फोडत हजारोंच्या साश्रू नयनांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली. असा मनमिळाऊ, दिलखुलास, दिलदार नेता परत होणार नाही. अशा अवेळी अजित दादांसारखा उमदा नेता गमावल्याने धक्का बसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
अजित पवार त्यांच्या मिश्कील शैलीसाठी प्रसिद्ध
अजित पवार हे त्यांच्या दमदार भाषणासाठी आणि मिश्किली शैलीसाठी प्रसिद्ध होते. कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला होता. अजित पवार भाषण करायला उभे राहायचे तेव्हा लोकांना आपलंसं करुन घेण्याची त्यांची शैली होती. अजित पवार यांनी कायमच लोकांची विविध कामं केली आहेत. तसंच ते त्यांच्या कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध होते.

