Ajit pawar is Casteist said Jitendra Awhad : “अजित पवारांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही”, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली होती. त्यावर, "अजित पवार हे पक्के जातीयवादी आहेत, मी स्वतः त्यांना कित्येकदा जातीयवाद करताना पाहिलं आहे". असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड म्हणाले, "अजित पवार अर्थमंत्री असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गांसाठी केलेल्या तरतुदींना कात्री का लावायचे?" आव्हाड यांनी यावेळी अजित पवारांची मिमिक्री करत त्यांना चिमटा काढला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "अजित पवार किती जातीयवादी आहेत हे मी जवळून पाहिलं आहे. अर्थसंकल्पात ते नेहमी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी तसेच इतर मागासवर्गांसाठी असलेल्या तरतुदींना कात्री लावायचे." आव्हाड उपरोधिकपणे म्हणाले, "अजित पवार हे खूप महान आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बोलू शकतात. त्यामुळे त्यांना महानच म्हणावं लागेल. ते कोणालाही काहीही बोलू शकतात. बारामती येथे त्यांनी केलेलं भाषण विसरता येणार नाही." यावेळी आव्हाड यांनी अजित पवारांच्या आवाजात (मिमिक्री करत) एक वक्तव्य केलं. "मला माहिती नाही या माणसाचं शेवटचं भाषण कधी होणार", हे अजित पवारांचं वक्तव्य आव्हाडांनी बोलून दाखवलं. तसेच त्यांनी प्रश्न विचारला की अजित पवारांचं हे वक्तव्य योग्य होतं का? हे ही वाचा >> Thackeray Group Vs MNS : उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन; म्हणाले, “तुम्ही हे सगळं…” राज ठाकरे काय म्हणाले होते? राज ठाकरे बीडमधील पत्रकार परिषदेत म्हणाले होते, "काही लोकांनी महापुरुष जाती-जातींमध्ये वाटून टाकले आहेत. काहीजण संतांची आडनावं बाहेर काढत आहेत. त्यामागून स्वतःच्या फायद्यासाठी जे काही राजकारण करायचंय, जे राजकीय उद्योग करायचे आहेत ते चालू आहेत. या सगळ्याची मला किव येते." राज ठाकरे हे सातत्याने ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. तसेच जातीपातीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली असा आरोप त्यांनी आतापर्यंत अनेकदा केला आहे. त्यावरून राज ठाकरेंना प्रश्न विचारला की तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल फार बोलत नाही, टीका करत नाही, असा आरोप होतोय. याव राज ठाकरे म्हणाले, “मी अजित पवारांबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते पूर्वी शरद पवारांबरोबर होते, पवारांचं जातीचं राजकारण चालू होतं… जेम्स लेन वगैरे प्रकरण चालू होतं… मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की अजित पवार हे कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत आणि ही गोष्ट निश्चित आहे.” हे ही वाचा >> मराठा आरक्षणाला विरोध की पाठिंबा? अजित पवारांची रोखठोक भूमिका; मनोज जरांगेंच्या मागणीबाबत म्हणाले… उंदराला मांजर साक्ष : आव्हाड दरम्यान, राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आव्हाड यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. यामध्ये म्हटलं होतं, माझे कितीही मतभेद असतील, पण अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत : राज ठाकरे… हे दोघे पक्के जातीवादी, उंदराला मांजर साक्ष.