राज्यात नेहमीच गृहमंत्री आणि गृहखात्याची कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा सुरुच असते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील याच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह विभागामुळे जयंत पाटलांचा बीपी वाढतो असे मिश्किलपणे म्हटले आहे. गृहखात्यामुळे जयंत पाटील यांना बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या भाषणांच्या शैलीमुळे आणि विविध किस्स्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. गृहखात्याच्या पदावरून पुण्यातील आंबेगाव येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

“आज राज्याची गृहविभागाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील याच्यावर आहे. सारखे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. कायदा सुव्यवस्था कशी योग्य राहील. कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. मागे आर आर पाटील, छगन भुजबळ यांनी तो विभाग सांभाळला आहे. मग जयंत पाटील यांनी एक वर्ष गृहमंत्री पद सांभाळलं. मी यावेळी जयंतरावांना म्हटलं की तुम्ही एकच वर्ष गृहमंत्री पदी होता, आता यावेळी परत घ्या ना. पण जयंत राव म्हणाले, नाही. गृहखाते घेतल्यावर माझा बीपी वाढला. मला बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या. लगेच पत्रकार ब्रेकिंग चालवतील, नाहीतर जयंत राव म्हणतील अजित तू काहीही माझं सांगत बसतो. दिलीपराव तसं आपलं काही होऊ नये. उलट आपल्याला ज्या काही व्याधी असतील त्या गृहखातं मिळालं म्हणून त्या सर्व व्याधी दूर व्हावं अन् तुम्ही एकदम ठणठणीत व्हा,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.    

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.