नांदेड ःराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या २२ ते २८ जुलै दरम्यान पक्षातर्फे ‘जनसेवा सप्ताह’ पाळण्यात येणार असून त्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यात १६ तालुक्यांतील प्रगतीशिल व प्रयोगशील महिला-पुरुष शेतकर्यांना ‘अजितदादा कृषी सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्याच्या उपक्रमाची जबाबदारी आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वीकारली आहे.
गतवर्षीपर्यंत २२ जुलै रोजी अजित पवारांचा वाढदिवस राज्यभर साजरा केला जात होता. गेल्या जानेवारी महिन्यात त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे यंदा २२ जुलै रोजी त्यांना आदरांजली अर्पण करून ‘जनसेवा सप्ताहा’ची सुरुवात केली जाणार आहे. पक्षाच्या राज्य शाखेकडून आलेल्या सूचनेनुसार नांदेड शहर व जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांची व्यापक बैठक सोमवारी येथे घेण्यात आली. या बैठकीत सबंध जिल्ह्यात विविध उपक्रम आणि कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले.
एक राजकीय नेते आणि सामाजिक व सहकार क्षेत्रातील अध्वर्यू या नात्याने अजित पवार यांचा ज्या-ज्या क्षेत्रांशी संबंध आला तसेच ज्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्या क्षेत्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना पक्षाच्या राज्य शाखेने दिली आहे. पर्यावरण संवर्धन, आरोग्यविषयक जनजागृती, महिला सक्षमीकरण, कृषी व इतर विषयांशी संबंधित कार्यक्रम जिल्हा व तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी येथे दिली.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात झालेल्या बैठकीस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांसह ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर, आ.प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे, अविनाश घाटे, ओमप्रकाश पोकर्णा आदी नेते वरील बैठकीस उपस्थित होते. जनसेवा सप्ताहाचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी पक्षाने पालकमंत्री आणि संपर्कमंत्री यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.
गेलो तर प्रतापरावांसोबतच…!
जनसेवा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची येथील बैठक ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांच्या संदिग्ध विधानाने चांगलीच गाजली. मागील काही दिवसांत खतगावकर यांच्या संदर्भात ते राष्ट्रवादी सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा बिलोली तालुक्यातून सुरू झाली. तो संदर्भ देत माध्यमांमध्ये माझ्या नावाची चर्चा फार होत आहे, असे नमूद करून मी पक्ष सोडून गेलोच तर प्रतापरावांनाही सोबत घेऊन जाईन, असे खतगावकर म्हणाले. त्यावर चिखलीकरांनी बैठकीमध्ये तसेच बैठकीनंतरही कोणतेही भाष्य केले नाही. पक्षाच्या नेत्यांमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली नाही, असे सांगण्यात आले.
