Ajit Pawar Last Phone Call Recording before Plane Crash: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर राज्यभरातील सर्वच पक्षांकडून शोक व्यक्त करण्यात आला. अजूनही अजित पवार यांच्या अकाली मृ्त्यूवर हळहळ व्यक्त होत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी चर्चेचा विषय ठरलेला असताना दुसरीकडे त्यांच्या विमानाला झालेला अपघात हा घातपात होता का? असा संशय खुद्द राष्ट्रवादीसोबतच इतरही काही नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याबाबत सविस्तर तपास चालू असतानाच अजित पवारांनी विमानातून अपघाताच्या ६ मिनीट आधी केलेल्या एका फोन कॉलचं रेकॉर्डिंग समोर आलं आहे. अजित पवारांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांनी हे फोन रेकॉर्डिंग माध्यमांसमोर ठेवलं आहे.
काय होता फोन कॉल?
बारामतीमध्ये अजित पवार यांचे चुलत पुतणे व पक्षाचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी अजित पवारांनी फोन कॉलवर शेवटचा संवाद केला होता. श्रीजीत पवार यांनी अजित पवारांना निवडणुकीसंदर्भात पाठवलेल्या एका मेसेजवर अजित पवारांनी थेट विमानातूनच त्यांना फोन करून त्यांच्या शंकेचं निरसन केलं होतं. यासंदर्भात श्रीजीत पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्या फोन कॉलचं रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर ठेवलं आहे. यामध्ये अजित पवारांनी श्रीजीत पवार यांना नेमकं काय सांगितलं, हे त्यांनी जाहीर केलं आहे.
“आपण माळी समाजालाही जिल्हा परिषदेसाठी एक उमेदवारी देऊ असा विषय होता. बारामतीमध्ये आपण एनटी समाजाच्या व्यक्तीला जिल्हा परिषदेला उमेदवारी दिली आहे. मार्केट यार्डला गावडेंना घेतलं आहे चेअरमन म्हणून. सातव नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे मी अजित पवारांना तसं विचारलं होतं. ते खरंतर माझं अज्ञान होतं की मला वाटलं आम्ही ओबीसींमधल्या माळी समाजाला उमेदवारी देऊ शकलेलो नाही. त्यामुळे मी मेसेज केला होता की दादा आपण माळी समाजाला एक संधी देऊ. त्यावर त्यांनी सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन जातोय असा संदेश दिला होता. ते जगाला कळावं, शेवटच्या श्वासापर्यंत तो माणूस सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करत होता हे कळावं म्हणून मी हे रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर आणलं. आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ हाच त्यांचा शेवटचा संदेश, शेवटचा आवाज होता”, असं श्रीजीत पवार यांनी सांगितलं.

“मी कधी काही अडचण आली तर त्यांना मेसेज करायचो. त्यांचा फोन यायचा. आज विमानात असतानाही त्यांनी फोन केला. मलाच नाही, कुठल्याही व्यक्तीने त्यांना फोन-मेसेज केला तरी त्याला अजितदादा उत्तर द्यायचे”, असंही ते म्हणाले.
फोनकॉलमध्ये काय झाला संवाद? वाचा…
अजित पवार – माहिती नसतं, काही नसतं.. उगीच काहीतरी करायचं. आम्हीही सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जातो बाळा.
श्रीजीत पवार – अजितदादा, मला जे वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडलं..
अजित पवार – मान्य आहे, बरोबर आहे. पण मी माळी समाजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी आत्ता दिलेली आहे. तिथे ओबीसींचं आरक्षण होतं. इतर पक्षांनी दुसरेच उमेदवार दिले आहेत. आपण असं काम केलंय.
श्रीजीत पवार – दादा तुम्हाला जो योग्य वाटतो तो अंतिम निर्णय घ्या.
फोनकॉल अर्धवट? काय म्हणाले श्रीजीत पवार?
दरम्यान, फोनकॉल अर्धवट सुरू झाल्यासारखं वाटत असलं, तरी ते तसं नसल्याचं श्रीजीत पवार म्हणाले. “मी अजित दादांना मेसेज केला होता. तो मेसेज त्यांनी वाचला आणि माझा नंबर त्यांच्या ओळखीचा असल्यामुळे त्यांनी फोन करून हॅलो वगैरे न बोलता थेट मुद्द्याचं बोलायला सुरुवात केली. त्यामुळे फोन रेकॉर्डिंग इतकंच आहे”, असं ते म्हणाले.
अजित पवारांच्या अपघातावेळी नेमकं काय घडलं?
२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी मुंबईहून त्यांच्या विमानाने बारामतीच्या दिशेनं निघाले. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरणं अपेक्षित होतं. पण तिथे पोहोचल्यानंतर पहिल्या प्रयत्नात विमानाचं लँडिंग करण्यात वैमानिकाला अपयश आलं. विमानानं आकाशात एक फेरी घेऊन पुन्हा एकदा लँडिंगसाठी प्रयत्न केला. यावेळी विमान धावपट्टीपासून बाजूला जात मोकळ्या जागेत कोसळलं. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अजित पवारांच्या विमान अपघाताची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. या घटनेत घातपाताचा व्यक्त करण्यात आलेला संशय पाहाता याबाबत सर्व तपशील जनतेसमोर यायला हवेत, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
अजित पवारांचं विमान कोसळण्यापूर्वी काय घडलं?
गोजूबावी गावाचे माजी सरपंच कल्याण अटोळे यांनी एबीपीशी बोलताना यासंदर्भातले दावे केले आहेत. विमान कोसळण्याच्या आधीपासून आपण ही घटना पाहिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “सकाळी ८.३५ च्या सुमारास गावातून एक मोठं विमान खूप मोठा आवाज करत घिरट्या घालत निघाल्याचं दिसलं. त्यानंतर धावपट्टीवर उतरताना ते डावीकडे कललं आणि पुढे जाऊन कोसळलं”, असं कल्याण अटोळे म्हणाले. “विमान कोसळल्यानंतर ४ ते ५ मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही पोहोचल्यानंतर तिथे विमानाचा मोठा स्फोट झाला. त्याचे तुकडे हवेत आणि आजूबाजूला १००-१५० फुटांवर पडले”, असंही अटोळे यांनी सांगितलं.
“मी उजव्या बाजूला उभा होतो. तेव्हा त्या बाजूच्या दरवाजातून निळी पँट घातलेली एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. त्याचा एक पाय दरवाजातून बाहेर आल्याचं मला जाणवलं. त्याचा दरवाजा थोडा उघडल्याचं दिसलं. तेवढ्यात आमच्या गावातले काहीजण ओरडले की ‘सरपंच तुम्ही मागे सरका, तिथे मोठा स्फोट होईल’. मी मागे सरकलो आणि काही क्षणांत मोठा स्फोट झाला. पूर्ण विमानाचे तुकडे-तुकडे झाले”, अशा शब्दांत अटोळे यांनी तिथला प्रसंग सांगितला.
अजित पवारांचं स्मारक बारामतीत, मला कसं माहिती नाही – शरद पवार
बारामतीमध्ये अजित पवारांचं स्मारक बांधलं जात असून खुद्द शरद पवारांनी तिथे जागेची पाहणी केल्याचा दावा केला जात आहे. शरद पवारांना आज सकाळी पत्रकार परिषदेदरम्यान प्रसारमाध्यमांनी याबाबत विचारणा केली असता त्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली. “अजित पवारांचं स्मारक बारामतीत होतंय ही गोष्ट मला माहिती नाही. ज्या संस्थेच्या जागेबाबत काही लोकांनी चर्चा केली, त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे या बाबतीत मला तरी माहिती असायला हवी. पण आम्ही त्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. त्याबाबत काय करायचं हे आम्ही सगळे लोक एकत्र बसून निर्णय घेऊ. पण तसं काहीही नसताना त्यावर भाष्य करणं योग्य नाही”, असं शरद पवार म्हणाले.

