Maharashtra Deputy CM and NCP Leader Ajit Pawar Last Rites Updates: राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि दिलदार नेतृत्व म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारे अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. बारामती विमानतळावर त्यांचं विमान उतरताना अपघातग्रस्त झालं आणि अजित पवारांसह विमानातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अशा अकाली निधनामुळे समस्त महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक वर्तुळाला मोठा धक्का बसला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या निधनावर मनस्वी शोक व्यक्त केला होता. अजित पवार हयात असताना अंजली दमानिया यांनी त्यांच्याविरोधात मोठा संघर्ष उभा केला होता. पण आता त्यांच्या निधनानंतर तो संघर्ष संपल्याच्या भावना अंजली दमानिया यांनी व्यक्त केल्या आहेत.

…आणि अजित पवारांचं विमान कोसळलं!

बुधवारी २८ जानेवारी रोजी अजित पवार, त्यांचा सुरक्षा रक्षक, विमानातील एक क्रू सदस्य, पायलट व को-पायलट असे सर्वजण खासगी विमानाने मुंबईहून बारामतीच्या दिशेनं निघाले होते. बारामतीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार तिकडे निघाले होते. बारामती विमानतळ परिसरात ८ वाजून ४० मिनिटांनी अजित पवारांचं विमान पोहोचलं. पण लँडिंगसाठी हवामान योग्य नसल्यामुळे वैमानिकाला धावपट्टीच दिसू शकली नाही. त्यामुळे लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. दुसऱ्यांदा पुन्हा लँडिंगसाठी प्रयत्न करण्यात आला. यावेळी धावपट्टी दिसत असल्याचं वैमानिकानं सांगितलं. पण धावपट्टीचा अंदाज चुकल्यामुळे अखेर विमान बाजूच्या मोकळ्या जागेत कोसळलं.

विमान कोसळताच विमानानं पेट घेतला. मोठा स्फोट झाला आणि विमानातील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह मुंबई पोलीस दलातील त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमीत कपूर, वैमानिक सांभवी पाठक व फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता.

अंजली दमानियांचा संघर्ष, आक्षेप, मागण्या…

दरम्यान, सिंचन घोटाळ्याप्रमाणेच इतरही अनेक प्रकरणांमध्ये अजित पवार, पार्थ पवार किंवा पवार कुटुंबातील इतर काही सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेतेमंडळी यांच्याविरोधात अंजली दमानियांनी मोहीम उघडली होती. अनेक पुराव्यांच्या आधारे अंजली दमानिया यांनी हा संघर्ष सुरू केला होता. प्रसंगी त्यांनी आक्रमक भूमिकादेखील घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पण आता अजित पवार यांच्या निधनानंतर हा संघर्ष संपल्याचं अंजली दमानियांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अंजली दमानियांच्या पोस्टमध्ये काय आहे?

अजित पवार यांच्याविरुद्ध मी माझ्या आयुष्याचा मोठा काळ संघर्ष केला. तो वैचारिक आणि तत्त्वांचा लढा होता. काल त्यांच्या निधनाने तो संघर्ष आज संपला आहे. मतभेद तीव्र होते, पण मृत्यूसमोर सर्व वाद थांबतात. आज हा क्षण विचार करण्याचा आहे..लोकशाही, मूल्ये आणि संघर्ष यांचा. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, असं अंजली दमानियांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

दरम्यान, अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार, नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं बारामतीमधील जनता उपस्थित होती. ‘अजित पवार अमर रहे’च्या घोषणांमध्ये आपल्या लाडक्या नेत्याला उपस्थितांनी शेवटचा निरोप दिला.