मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदांसाठी मतदान होत असून त्यासंदर्भात मतदारांना आवाहन केलेला अजित पवार यांचा विमान अपघातापूर्वी बनवलेला व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी प्रसिद्ध केला. यामध्ये अजित पवार यांनी विकासाच्या प्रवासात राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन केलेले आहे.
१ मिटीन ४८ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी तो चित्रीत केलेला आहे. २४ जानेवारी रोजी हा व्हिडीओ बनवला आणि २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. शनिवारी जिल्हा परिषदांसाठी मतदान होत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सदर व्हीडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला.
जिल्हा परिषद या ग्रामविकासाची किल्ली आहे. तुमच्या गावाचा, जिल्ह्याचा विकास कोण करणार आहे हे निवडण्याची तुम्हाला संधी आली आहे. मी शब्दाचा पक्का व कामाचा माणुस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच ग्रामीण विकासाला प्राधान्य दिलेले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडुन द्या. विकासाच्या या प्रवासात तुम्ही सहभागी व्हा. तुमचे एक मत गावचे भविष्य उज्वल करु शकते, असे अजित पवार यांनी या व्हिडीओमध्ये आवाहन केलेले आहे.
अजित पवार २८ जानेवारी रोजी मुंबई ते बारामती असा विमान प्रवास करत होते. त्यांच्या विमानाला सकाळी ८.३० च्या सुमारास अपघात झाला. त्या दिवशी पवार यांच्या बारामती तालुक्यात चार सभा होत्या. महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची मोठी हार झाली होती. नगरपंचायती-नगरपरिषदांमध्ये ११०० आणि महानगरपालिकांमध्ये १६८ नगरसेवक राष्ट्रवादीचे विजयी होऊ शकले होते. त्यानंतर अजित पवार यांनी खचून न जाता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कंबर कसली होती.
अजित दादांचा शेवटचा व्हिडीओ : अपघाताच्या ४ दिवस पूर्वी देवगिरीवर बनवला, अजित पवारांचे काय केले आवाहन?https://t.co/ZfyIjgKlXt#MaharashtraPolitics #AjitPawarPlaneCrash #Lastvideo #NCP #Viralvideo pic.twitter.com/hR2TT6YmZs
— LoksattaLive (@LoksattaLive) February 6, 2026
अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीला या निवडणुकीत सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे.अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात विशेष जोम नव्हता. सर्व पक्षांनी साधेपणाने प्रचार केला आहे. अनेक गावांनी तसे ठराव केले होते. राष्ट्रवादीचा ग्रामीण भागात त्यातही पश्चिम महाराष्ट्रात चांगला जम आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
सहानुभूतीची लाट ? अजित पवार यांचा मतदारांना आवाहन करतानाचा व्हिडोआ आज पक्षाने समाज माध्यमांवर प्रकाशित करताच जोरदार व्हायरल झाला. हा १.४८ सेकंदाचा व्हिडीओ मात्र सध्या जोरदार चर्चेत आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कितीपत सहानुभूती दाखवतात हे निकालात कळणार आहे.
