Ajit Pawar Passes Away: अहिल्यानगर: अपघाती निधनाच्या दुर्दैवी घटनेमुळे आश्वी व परिसरातील गावांवर शोककळा पसरली. अश्वी बुद्रुक बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. अश्वी बुद्रुक बाजारपेठ परिसरात प्रसिद्ध आहे. येथील व्यावसायिक, व्यापारी यांनी स्वतःहून आपली दुकाने व्यवहार बंद ठेवत लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. परिसरावर शोककळा पसरली होती. नागरिक गटागटाने चर्चा करत हळहळ व्यक्त करत होते.
देवळाली प्रवरा शहर अजित पवार यांचे आजोळ आहे. या शहराशी त्यांचे भावनिक नातेही जोडलेले आहे. त्यांचे बालपणही काहीकाळ तेथे गेलेले आहे. भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम हे त्यांचे मामेभाऊ. त्यामुळे त्यांचे देवळालीला नेहमी येणे जाणे असे. सहा महिन्यापूर्वीच त्यांनी देवळाली प्रवराला भेट दिली होती. या घटनेची आठवण काढत नागरिक, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वतःहून बंद केली व कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली अर्पण केली. मामेभाऊ कदम यांच्या निवासस्थानी नागरिकांनी गर्दी केली होती. कदम यांनाही अश्रू आवरणे मुश्किल झाले होते. दादांचे बालपण देवळाली प्रवरात गेले. लहानपणी गोट्या, विटी-दांडू, क्रिकेट खेळणे, विहिरीत पोहणे अशा अनेक आठवणी कदम यांनी यावेळी सांगितल्या. मात्र हे सांगताना प्रत्येकवेळी त्यांना हुंदका येत होता. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, अजित कदम, अशोक कदम, अमित कदम, सुनील कदम, शैलेंद्र कदम असा कदम परिवर तातडीने बारामतीला रवाना झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जामखेड शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले. या बंदला व्यापारी व नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच जामखेड शहर बंद ठेवण्यात आले होते. एक कार्यक्षम प्रशासक व परखड व्यक्तिमत्व, राजकारणातील धुरंधरून नेता हरपला, असे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते. जामखेड शहरात निधनाची बातमी येऊन धडकताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी खर्डा चौकात जमा झाले. एक दिवसाचा दुखावटा म्हणून शहरातील व्यापारी व नागरिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सुनील जगताप, लक्ष्मण ढेपे, शहाजी राळेभात, कैलास हजारे, इस्माईल सय्यद, राहुल उगले, विनायक राऊत, अवधूत पवार, विकास राळेभात, राजू गोरे, हरिभाऊ आजबे आदींनी केले. या वाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी बंद पाळला.
अजित पवार यांचे आजोळ देवळाली प्रवरा शहर कडकडीत बंद ठेवून श्रद्धांजली
